लातूर : 11 सप्टेंबर 2023 | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. तर, देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या मुंबईत झालेल्या तिसऱ्या बैठकीचे आयोजनही शिवसेनेने केले होते. यावरून भाजपने ‘शिवसेना लवकरच कॉंग्रेस होईल’ अशी टीका केली होती. त्याला जळगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. ‘ज्यांच्यासोबत आम्ही 25 वर्ष काढली. ते सोबत असताना पक्षाला आम्ही भाजप होऊ दिले नाही. तर, आता आम्ही कॉंग्रेस कशी होणार, कमळाबाई?’ असा सवाल ठाकरे यांनी केला होता. तसेच, देवेंद्र फडणवीस यांचा ‘टरबूज्या’ असा उल्लेखही त्यांनी केला होता. ठाकरे यांची टीका भाजपच्या जिव्हारी लागली. त्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. ‘ज्यांना मते दिली ते मोठे झाले. त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यांचा फुगा फुगला आहे. त्या फुगेल्या फुग्याला टाचणी लावायची आहे.’ अशी टीका त्यांनी मंत्री पाटील यांच्यावर केली.
‘तुम्ही कसले पोलादी पुरूष? 17 तारखेला सर्व खायला येत आहेत. लूटालूट करायची सर्वांनी. स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेतात. पण, ते तकलादू पुरूष आहेत. फक्त फोटो आला पाहिजे. चमकोगिरी करायची. यांना सत्तेची खाज आलेली आहे. परंतु, खाजवायचं सोडून फोडाफोडी करतात. त्यांना माहित नाही खाज सुटली तर खाजवायचं असतं फोडाफोडी करायची नसते. आम्ही भारत म्हणू, इंडिया म्हणू, हिंदूस्थान म्हणू. आम्ही तेथील सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. पंतप्रधान बदलणार आहोत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली होती.
उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘टरबूज्या’ असा केला होता. त्यामुळे भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत त्यांचा उल्लेख ‘वाळलेला भोपळा’ आणि ‘काकडी’ असा करत गांधी चौकात निषेध व्यक्त केला.