कोल्हापूरः राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची अडचण वाढते आहे का, त्यांच्या पदावर टांगती तलवार आहे का, असे विचारण्याचे कारण म्हणजे शुक्रवारी अचानकपणे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर केलेला हल्ला. या हल्ल्याची माहिती आधी मीडियाला कळाली आणि नंतर पोलीस आले याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात बोलताना जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना नेमके याच मुद्यावर बोट ठेवले. त्यांनी पोलिसांच्या अपशयावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. एकीकडे विरोधकांचे सुटणारे वाकबाण आणि दुसरीकडे स्वपक्षातून दिग्गजांचे मिळणारे खडे बोल पाहता आता अनिल देशमुखानंतर एका वेगळ्याच कारणासाठी दिलीप वळसे-पाटील यांचे गृहमंत्री पद जाणार का, अशी चर्चा रंगताना दिसतेय. याचे उत्तरही येणाऱ्या काळात मिळेलच.
अजित पवार पुण्यात बोलताना म्हणाले की, माझे स्पष्ट मत आहे की, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवण्याचे काम त्यांचे (पोलिसांचे) असते. त्यामध्ये हे लोक कुठे तरी कमी पडले हे निर्विवाद सत्य आहे. कारण ते लोक जेव्हा तिथे आले होते, तेव्हा त्यांच्यामागे मीडियाचे पण कॅमेरे आहेत. मीडियाचे कॅमेरे येतात म्हणजे मीडिया बरोबर माहिती होती, मीडियाचे पण ते काम आहे. कुठे काय चालले आहे ते अॅक्युरेटपणे दाखवायचा प्रयत्न करायचा. मग हे जर मीडियाने शोधून काढले तर पोलीस विभागाच्या संबंधित यंत्रणेला का नाही शोधून काढता आले नाही. त्याबद्दल एका वरिष्ठ अधिकाऱ्याला चौकशी करायला सांगितल्याचेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये यावर भयावह या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस म्हणाले की, एसीट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. मात्र, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची माहिती मीडियाला होती, मग पोलीस काय करत होते. पोलिसांची चौकशी व्हायला हवी. हे अतिशय भयावर असे चित्र होते. पोलिसांचे हे मोठे अपयश आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या हल्ल्याचा आम्ही निषेधच करतो, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एकंदर स्वपक्ष, सरकार आणि आता विरोधी पक्षांकडून टीकेचे धनी झालेल्या दिलीप वळसे-पाटलांची गृहमंत्री पदाची खुर्ची जाणार का, अशी चर्चा जोरात सुरू झाल्यास नवल नको वाटायला.