मुंबई : आज सगळीकडे शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह सुरू आहे. सगळा महाराष्ट्र भगवा झाला आहे. अशात राजकीय नेत्यांचे शिवजयंतीचे कार्यक्रमही धडाक्यात सुरू आहेत. मात्र ही नेतेमंडळी कोणत्याही स्टेजवरून एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. आज मुंबईतल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विरोधाकांना पुन्हा जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांना (Mahavikas Aghadi) उद्देशून बोलताना, महाराजांचे कार्यक्रम अडवणाऱ्यांना महाराजच शिक्षा करतील, अशी टीका केली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम कोण अडवतंय? असा सवालही उपस्थित झाला आहे. तसेच ही फक्त जयंती नाही, या राजाने लढायला शिकवलं. शत्रू कितीही मोठा असूद्या तुमचा विजय होतो. या लढाईत सामान्य मानसाचा विजय होईल, असे सूचक विधानही फडणवीसांनी केले आहे.
भगवा त्यागाची आठवण करून देतो
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीची संख्या न पाहता वंचितांचे राज्य उभारले. राम राज्यानुसार सर्वांना समान अधिकार दिले. तेच सूत्र पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणकारी सरकार चालविले जात आहे. तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आमचा भगवा आठवण करून देतो त्यागाची. ज्या काळात महाराष्ट्रावर अत्याचाराची मालिका सुरू होती. त्या काळात एका क्रांतीचा जन्म झाला. ती क्रांती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आठरपगड जातींना एकत्रित केलं. मावळ्यांची संख्या कमी होती. पण ते लाखांना भारी होते. या लढवय्या मावळ्यांना पाहून औरंगजेबही अचंबित झाला होता. शिवाजी महाराजांना परास्त का करू शकत नाही? असा सवाल त्यांनी केला होता. त्यावेळी, औरंगजेबाच्या दरबारींनी जे उत्तर दिलं ते थक्क करणारं होतं. आपलं सैन्य लढतं ते आपल्याकडे नोकर आहे म्हणून. शिवाजी महाराजांचे मावळे हे स्वत: करता लढत नाहीत. तर रयतेसाठी लढत असतात. त्यामुळेच ते आपल्याला पराजित करत असतात. जोपर्यंत मावळ्यांच्या रक्तात, विचारात आणि कृतीत शिवाजी आहे तोपर्यंत ते पराजित होऊ शकणार नाही, असं उत्तर औरंगजेबाला देण्यात आलं, असं फडणवीस यांनी सांगितलं.
ठाण्यातही फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामाचं महाविकास आघाडीकडून श्रेय घेतलं जात आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच नियमावली मंजुरी केली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीला आणखी एक वर्षभराचा कालावधी लागला. सध्याच्या काळात आपण न केलेल्या कामाचेही श्रेय घेण्याचा काही लोकांनी सपाटा लावला आहे. कोणतेही काम आमच्याचमुळे झाले असल्याचा दावा केला जात आहे. एखाद्याचे लग्न झाले किंवा एखाद्या व्यक्तीला मुलगा झाला तरी काही जण श्रेय घेतात. आमच्या प्रेरणेने त्यांना मुलगा झाल्याचे म्हणतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता हा टोला लगावला. मात्र, त्यांच्या टीकेचा रोख ठाकरे सरकारवर असल्याचं बोललं जात आहे.