अहमदनगर : काँग्रेसच्या कोणी संपर्कात नाही तर काँग्रेसच संपर्क करत असते. काँग्रेसला संपर्काची आवश्यकता नाही. कारण, निम्मे लोक वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करत असतात. मात्र, मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की तो माझा विषय नाही. वरिष्ठांना भेटा. ते वरिष्ठ स्तरावर भेटले असतील तर त्याचे पुढे काय झालं ते मला माहित नाही. मात्र काही झालं तर टीव्हीच्या माध्यमातून कळेल, असं सूचक वक्तव्य अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. जे काही संपर्कात आहे त्यांना घेऊन काही उपयोग नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे आता तीन वर्षानंतर घराबाहेर पडले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात काय चाललंय हे पाहायलाच पाहिजे. आपण काय दिलं त्यावर जनतेच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि काय अपेक्षा आहेत हे त्यांनी जाणून घ्यायला हवे. उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांना प्रतिसाद चांगला मिळत असला, प्रत्येक सभांना गर्दी होत आहे. पण, जनता मतदान करताना काम करणाऱ्या माणसांनाच मतदान करणार असे सुजय विखे पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात सभा घेतली. त्यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना शकुनी मामा म्हटलं. पण, जे लोक फडणवीस यांचा शकुनी मामा असा उल्लेख करत आहेत ते मागच्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात महाराष्ट्रात फिरत होते असा टोला त्यांनी लगावला.
ते खासदार कधीही अतिवृष्टीमध्ये किंवा राज्याला आवश्यकता होती तेव्हा कुठे दिसते नव्हते. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगात ते घोड्यावर होते, बैलगाडा शर्यतीत पण ते घोड्यावरच होते. ते कधी जमिनीवर आलेच नाही, त्यामुळे त्यांना वास्तविकता माहित नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
अमोल कोल्हे अतिशय उमदे अभिनेते आहेत. मनोरंजन म्हणून त्यांचे भाषण पाहावं, या पलीकडे त्यांच्या भाषणात काहीही नव्हतं. डायलॉग डिलिव्हरी अतिशय उत्तम करतात आणि लवकरच त्यांना कुठलातरी उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्याचा प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत असा खोचक टोलाही विखे यांनी लगावला.