Devendra Fadnavis Kundali : देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यावेळी त्यांनी 2014 ते 2019 असा आपला पाच वर्षांचा काळ पूर्ण केला होता. मात्र दुसऱ्यांदा त्यांनी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे सरकार अवौट घटकेचं ठरलं, फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर आता 2024 ला राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जाणून घेऊयात देवेंद्र फडणवीस यांची कुंडली काय सांगते, हे सरकार स्थिर राहणार का? फडणवीस पुन्हा एकदा आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का?
फडणवीस यांचा जन्म 22 जुलाई 1970 साली झाला. त्यांच्या जन्म तारखेनुसार त्यांच्या कुंडलीमध्ये सध्या शनी आणि राहू ग्रहांची दशा सुरू आहे.ज्येतिष शास्त्रात याला विपरीत राजयोग असंही म्हणतात. त्यामुळे येणारा काळ हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीय संघर्षाचा असू शकतो. या काळात फडणवीसांना अंतर्गत राजकीय कलाहांचा सामना करावा लागू शकतो. कारण त्यांच्या कुंडलीमध्ये सध्या पाचव्या भावात शनी आहे. त्यामुळे संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र जरी असं असलं तरी देवेंद्र फडणवीस हे आपला पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.
दरम्यान फडणवीस यांच्या कुंडलीनुसार पुढील पाच वर्षांमध्ये सरकार हे शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. तसेच लाडकी बहीण या सारख्या योजना सुरूच राहणार आहेत मात्र याच्या श्रेयवादावरून संघर्ष निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.