राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप 132 जागा जिंकूण सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे. नव्या सरकारमध्ये जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. जुन्या पॅटर्ननुसार पुन्हा एकदा राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांची भाजप पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे. उद्या फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एक उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार का? हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पत्रिकेमध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. आग्रहाचे निमंत्रण, विश्वगौरव मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आणि सन्मानीय उपमुख्यमंत्री तथा मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला आपण उपस्थित रहावं ही अग्रहपूर्वक विनंती. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश असा मजकूर या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आला आहे.
शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला 22 राज्याचे उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तब्बल चाळीस हजार लोक या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत.