नागपूर : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना कधीही संघर्ष करावा लागला नाही ना त्यांनी संघर्ष पाहिलाय. त्यामुळे मर्सिडीज बेबीला संघर्ष काय कळणार, असा टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना दिला आहे. बाबरी मशीद (Babri Masjid) पाडताना मी स्वतः तेथे उपस्थित होतो, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील सभेत सांगितल्यानंतर फडणवीसांवर राष्ट्रवादी तसेच शिवसेनेकडून कडाडून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी फडणवीसांचं वय तेव्हा फक्त 13 वर्षे होतं.. असं म्हटलं तर आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोमणा मारला होता. देवेंद्र फडणवीस 1857 च्या उठावातही होते, असंही म्हणतील, असा टोमणा आदित्य ठाकरे यांनी मारला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की त्या वेळी ते नगरसेवक होते.
बाबरी मशिदीवरून आदित्य ठाकरे यांनी मारलेल्या टोमण्यााल उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,’सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत, यांना न संघर्ष करावा लागलाय, ना त्यांनी तो पाहिलाय. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात. पण आमच्यासारख्या हजारो, लाखो कारसेवकांना आमच्या कृतीचा गर्व आहे. ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला गेला, त्यावेळेस मी तिथे होतो. मी नगरसेवक होतो.’
देवेंद्र फडणवीस 1857 मधील उठावात सामिल होते, या टोमण्यालाही फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ‘ मागील जन्मावरही विश्वास आहे पुढील जन्मावरही विश्वास आहे. त्यामुळे कदाचित मागच्या जन्मात मी असेन तर 1857 च्या युद्धात तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढलो असेल. आणि तुम्हीही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल. कारण आता तुम्ही अशाच लोकांशी युती केली आहे, जे 1857 ला स्वातंत्र्य युद्धच मानत नाहीत. ते म्हणतात, ते शिपायाचं बंड होतं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मनसेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘ नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या हनुमान चालिसावरून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावणार असेल तर भोंग्याच्या संदर्भात काय भूमिका घेतील, याची आपल्याला कल्पना आली असेल. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार ती जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडावी लागेल. ती त्यांनी मांडली आहे.’