मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, एकजण फरार आहे. दरम्यान मंगळवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आज देशमुख यांनी अंतरवालीमध्ये जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज अंतरावाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, आमची ही कौटुंबिक भेट होती. संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो तपास आहे, तो कुठपर्यंत आला आहे, त्यामध्ये काय अपडेट आहे, यासंदर्भात उद्या मी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडून माहिती घेणार आहे, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या भेटीवर मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय देशमुख यांच्यासोबत कौटुंबीक चर्चा झाली, संतोष देशमुख यांचे कुटुंब अजूनही दुःखात आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. ते अश्रू पुसण्याचे काम सरकारने न्याय देऊन केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये सुरू असलेली गुंडगिरी संपवली पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे, तसेच या प्रकरणात एसआयटी देखील गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात मंगळवारी देशमुख कुटुंंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.