बीड : बीडमधल्या मुंडे बंधू भगिनींचं राजकीय वैर गेल्या काही वर्षापासून सगळा महाराष्ट्र पाहत आहे. काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) निशाणा साधला होता त्याला आता धनंजय मुंडेंकडून प्रत्युत्र आलंय. पंकजा मुंडेंना बोलताना त्यांना भान राहत नसल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. बीड जिल्ह्याची बदनामी त्या स्वतः करतात, किमान ज्या ठिकाणी जन्माला आलो तिथला अभिमान असला पाहिजे, असा टोलाही धनंजय मुंडेंनी लगवाला आहे. आपल्या जिल्ह्यातली लक्ष्मी हरवलीय, त्यामुळे हे वाईट दिवस आले आहेत. मी पालकमंत्री असते तर जिल्ह्याचा विकास केला असता. त्यात कोणताही भेदभाव केला नसता, असा थेट निशाणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर साधला होता, त्यालाच धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
थेट नाव घेऊन बोला, धनंजय मुंडेंचं आव्हान
इतर कोणताही मुद्दा मिळाला नाही, की काहीतरी बोलायचं जर माफियाराज असेल तर नाव घेऊन बोला असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिलं आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा पेटला आहे, याआधीही अनेकदा पंकजा मुंडे यांनी तोडपाणी नेते अशा शब्दात धनंजय मुंडेवर टीका केली आहे. निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात लढताना पंकजा मुंडे यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे, त्यामुळे आता पुन्हा पंकजा मुंडे जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. बीडमधील ऊसतोड मजुरांचा प्रश्न असो किंवा इतर कुठला मुद्दा, पंकजा मुंडे धनंजय मुंडेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, धनंजय मुंडेकडूनही तसेच प्रत्युत्तर देण्यात येते.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर निशाणा साधला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका त्यांनी केली. त्या म्हणाल्या, मीडियाला विनंती आहे, एकदा लोकांमध्ये जाऊन विचारा. मी जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा खूप काही केले. माझ्या वडिलांचे ऋण उतरवण्याचे काम केले. मात्र मागच्या पाच वर्षात स्थिती उलट झाली. हा जनतेसाठी मोठा धडा आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्या जिल्ह्यातील लक्ष्मी हरवली आहे. म्हणून बीड जिल्ह्याला वाईट दिवस आले आहेत. शेतकरी म्हणतात विमा मिळाला नाही, तेव्हा मला वाईट वाटते. मी पालकमंत्री असते तर अधिकाऱ्यांचे कान धरले असते. शेतकऱ्यांचे काम आधी केले असते. मी विकास करताना कोणते गाव कुठल्या पक्षाचे आहे, हे पाहिले नाही. मात्र सध्याच्या पालकमंत्र्यांनी भेदभाव केला. बीड जिल्ह्यातील राजकारणी कंत्राटदार झाले आहेत. मी बारामतीच्या पंचायत समसितीला निधी दिला होता, मात्र भेदभाव कधीही केला नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.