नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अंबाजोगाई | 8 मार्च 2024 : परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. ही माहिती मिळताच मुंबईवरून आपले दिवसभराचे कामकाज आटोपून महाशिवरात्रीसाठी परळी कडे निघालेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे अचानक मध्यरात्री अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात येऊन पोहोचले. परळी मतदारसंघातील निरपणा या गावातील काही जणांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. हे वृत्त कळताच धनंजय मुंडे यांनी आपला परळीच्या दिशेने जाणारा ताफा वळवला आणि ते अंबाजोगाईला पोहोचले. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या चौकशीसाठी मध्यरात्री ते पोहोचले आणि सर्वांची नीट विचारपूस केली.
राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा दिवस आज सकाळी नऊच्या सुमारास सुरू झाला होता. दिवसभर विविध शासकीय कामकाज, बीड रेल्वे संदर्भातील बैठक, त्याचबरोबर महा ऍग्रो ॲपचे अनावरण यांसह विविध शासकीय कामकाज आटोपून सायंकाळी धनंजय मुंडे हे महाशिवरात्रीसाठी परळी कडे निघाले होते.मध्यरात्री 12 वाजायच्या आधी जाऊन शिवरात्री निमित्त परळी येथील प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घ्यायच्या या हेतूने त्यांनी परळीच्या दिशेने प्रस्थान केले. पण वाटेतच त्यांना निरपणा गावातील काही जणांना विष बाधा झाल्याचे वृत्त समजले, त्याबरोबर त्यांनी आपला ताफा अंबाजोगाईकडे वळवत आधी मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे समजले व दर्शन घेणे पुढे ढकलले !
मध्यराततरी धनंजय मुंडे यांनी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. तेथे जाऊन त्यांनी निरपणा गावातील अन्नातून विष बाधा झालेल्या सर्वच रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांना धीर दिला. तसेच त्यांच्यावर तातडीने योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या; तसेच सदर रुग्णांना भगरीतून विषबाधा झाली असल्याने याबाबत योग्य चौकशी करण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी अन्न भेसळ व सुरक्षा अधिकारी श्री देवरे यांना दूरध्वनीवरून दिले. यावेळी स्वारातीचे डीन डॉ.धपाटे, डॉ. मोगरेकर, डॉ.चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, तानाजी देशमुख, विश्वंभर फड, रणजित चाचा लोमटे, अजित गरड यांसह आदी उपस्थित होते.
सर्वच रुग्णांची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टर योग्य ते उपचार करत असल्याचे अधिष्ठाता डॉ.मोगरेकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र धनंजय मुंडे यांचा सकाळी 9 वाजता सुरू झालेला दिवस मध्यरात्री 12 नंतर देखील संपला नाही, 12 नंतरही मुंडे लोकांच्या कामातच असल्याचे अनुभवायला मिळाले.