संभाजी मुंडे, बीड (परळी) : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) आणि मुंबईत वरळीला (Worli) जे महत्त्व आहे, तेच महत्त्व माझ्या परळीला मिळवून द्यायचं हे माझं स्वप्न आहे, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सांगितलंय. परळी येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबद्दल सविस्तर भूमिका मांडली. आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये वरळी मतदार संघावर भाजप आणि शिवसेनेचं विशेष लक्ष आहे. हाच मुद्दा पकडत धनंजय मुंडे यांनी वरळी आणि परळीवरून वक्तव्य केलंय. मुंबईत वरळीचा मुद्दा जेव्हा जेव्हा समोर येतो, तेव्हा तेव्हा मला परळीबद्दल मी पाहिलेल्या स्वप्नाची आठवण होते, ते स्वप्न स्वस्थ बसू शकत नाही. माझ्या मनातील हे चित्र साकार करण्यासाठी, परळीचा आर्थिक विकास करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलंय. परळीत आयोजित परळी भूषण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
मागील सहा वर्षांपासून केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये परळी वैद्यनाथ ऐवजी झारखंडमधील वैद्यनाथ धामाला ज्योतिर्लिंगाचा दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे केंद्र सरकारचा विकासनिधीदेखील झारखंडला देण्यात आलाय. मात्र शिवपुराणातील वर्णनानुसार परळी वैद्यनाथच हे ज्योतिर्लिंग आहे, असे दाखले असताना केंद्र सरकारने हे बदल का केलेत, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. केंद्राच्या गॅझेटमध्ये परळीला स्थान मिळवून देण्याचं माझ्यासमोरचं एक आव्हान आहे आणि तुमच्या साथीने मी ते पूर्ण करणार, असं धनंजय मुंडे म्हणाले.
स्थानिक लोकांनी महत्त्व दिलं तरच आपल्या तीर्थक्षेत्राला महत्त्वा प्राप्त होईल, यावर धनंजय मुंडे यांनी जोर दिला. ते म्हणाले, ‘ आपण इथून तिरुपतीला जातो. उद्या लातूरला सिद्धेश्वरची यात्रा भरली तर परळीचे लोक सिद्धेश्वरला गर्दी करतात. पण आज शिवरात्रीच्या परळी यात्रेला कोण कोण गेलंय… मोजून २० हात असतील. परळीचं महत्त्व आपणच वाढवावं. इतर मोठ्या यात्रांचं महत्त्व आपण वाढवतो. पण आपल्या ज्योतिर्लिंगाचं स्थानाकडे लक्ष द्यायचं नाही. आपणच तिरुपती मोठा करायचा आणि प्रभू वैद्यनाथाचं महत्त्व कमी करायचं, असं कसं चालेल?
केंद्रसरकारने झारखंडचं ज्योतिर्लिंग विकसित करण्यासाठी झारखंडला 1600 कोटी रुपये दिले. आम्ही म्हणतो 16 हजार कोटी तिथे द्या. परळीचा विकास करण्यासाठी आम्ही आमच्या पैशांतून करू, शासनाला पैसा मागणार नाहीत, पण आमच्या ज्योतिर्लिंगाचं महत्त्व कमी करू नका, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय.