‘लाडकी बहीण योजने’वरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं दिसत आहे. असं असतानाच लाडकी बहीण योजना मीच आणल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्ष दावा केला आहे. लाडक्या बहिणीची साथ देणारा हा एकनाथ आहे. यापुढे दरमहा तुम्हाला दीड हजार मिळणार आहेत. ही योजना कोणीही माईचा लाल बंद करू शकत नाही. लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावाला जोडा मारा…. सोन्याचा चमचा, पौश्याच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळत नाही. माझी आई घर चालवताना कसं मन मारून घर चालवायची हे मी पाहिले आहे. म्हणून माझ्याकडे सूत्र आल्यावर मी माझ्या दोन्ही सहकाऱ्यांना सांगितले की आपण ही योजना सुरू करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाराशिवच्या सभेत म्हटलं आहे.
सर्व योजनेसाठी आम्ही पैश्याची तरतूद केलीय. एकदा बाण धनुष्यातून सुटला तो सुटला तसा मुख्यमंत्री किंवा तुमच्या भावाने शब्द दिला म्हणजे दिला. या योजना बिलकुल बंद होणार नाही. आम्ही बहिणींना दीड हजारावर थांबवणार नाही तर तुम्हाला लखपती दिदी बनवणार आहोत. महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर देशाचा विकास…., असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
लाडका भाऊ योजना देशात केवळ महाराष्ट्र राज्यात आहे. या योजनेद्वारे दीड लाख भावांची नोंदणी झाली आहे. त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. महिलांना एसटी प्रवासात अर्धे तिकीट दिले आणि तोट्यातील एसटी फायद्यात आली. अनेकजण आम्हाला म्हणाले अर्धे तिकीट केल्यास एसटी तोट्यात येईल. पण बहिणीचे आशीर्वाद मिळाले आणि एसटी फायद्यात आली. विरोधक म्हणाले योजनेसाठी पैसे कुठून आणणार? पण यांचे नेते म्हणाले होते खटाखट पैसे देणार. पण आम्ही ते पैसे प्रत्यक्षात दिले. एका सिनेमात डायलॉग आहे की, ‘एक बार जो मैने कमिटमेन्ट दी, तो मै अपने आप की भी नही सुनता’ या डायलॉग प्रमाणे महायुती सरकार आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे पुढेही पाळत राहणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
2019 ते 2022 अडीच वर्ष शिवसैनिकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागत होता. म्हणून आम्ही उठाव केला. बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आणले आणि पाहिले सरकार उलथावून टाकले. त्यानंतर राज्यातील सगळे बंद केलेले विकास प्रकल्प सुरू केले. मागील काळात आपले राज्य 3 नंबरला गेले होते पण आता पुन्हा आम्ही ते 1 नंबरला आणले याचा मला अभिमान आहे. सगळे लोक सरकार मध्ये जातात पण आम्ही विरोधात गेलो आणि बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार आणले. आगामी काळात आम्ही 1500 चे 3000 करू मात्र आम्हाला तुम्ही बळ द्या. 3000 देताना सरकार हात आखडता घेणार नाही, असा शब्दाही शिंदेंनी यावेळी दिला.