बीडच्या घटनेची तुळजापुरात पुनरावृत्ती, सरपंचाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

| Updated on: Dec 27, 2024 | 11:10 AM

तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बीडच्या घटनेची तुळजापुरात पुनरावृत्ती, सरपंचाला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
tujapur sarpanch
Follow us on

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे राजकारण तापले आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नेमकं काय घडलं?

धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. मध्यरात्री 1 च्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली. नामदेव निकम हे मध्यरात्री गाडीने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊही गाडीत होता. यावेळी अचानक काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या गुंडांनी दगडाने गाडीच्या काचा फोडून, गाडीत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव निकम बारुळ हे मेसाई जवळगा गावच्या दिशेने जात होते. ते गाडी चालवत असताना मध्यरात्री अचानक त्यांच्या गाडीच्या दोन्ही बाजूंनी दोन बाईक आल्या. बाईकवरचे लोक हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे असावे, असं समजून त्यांनी गाडीचा वेग कमी केला. पण त्या बाईकस्वारांनी डाव्या दरवाजाची काच दगडाने फोडली. त्यानंतर पेट्रोलचे फुगे गाडीत टाकले.

यानंतर नामदेव बारुळ यांनी गाडीचा वेग वाढवला. त्यावेळी बाईकवरच्या गुंडांनी आमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकली. अंड्यांमुळे काच खराब झाल्याने आम्हाला गाडीचा वेग कमी करावा लागला. त्यानंतर बाईक जवळ आणत गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला, असे नामदेव यांनी सांगितले.

परिसरामध्ये भीतीचं वातावरण

नामदेव निकम बारुळ यांच्यावरील हा हल्ला पवनचक्कीच्या वादावरुन झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर आता धाराशिवमध्ये घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई करत गुन्हेगारांना कधी ताब्यात घेतील याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.