देशात लोकसभा निवडणुकीचा रण संग्राम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्पातील मतदान आज होत आहे. आज संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर एक्झिट पोल समोर येतील. निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या सगळ्या पार्शभूमीवर महाराष्ट्रात मात्र घडामोडींना वेग आला आहे. निकालाच्या दोन दिवसआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला उमेदवाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. या महिला नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
निकालाला केवळ दोन दिवस शिल्लक असतानाच महायुतीच्या धारशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून जाहीर सभा घेतली होती. मात्र सभा घेण्याची परवानगी नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवार अर्चना पाटील आणि त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लातुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अर्चना पाटील यांनी रॅली काढली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. यावेळी अर्चना पाटील यांच्या रॅलीला परवानगी होती. मात्र अजित पवारांच्या सभेला परवानगी नव्हती. विनापरवाना अजित पवारांची सभा घेतल्याने आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आता अखेर 43 दिवसांनी गुन्हा दाखल झाला आहे.
अर्चना पाटील यांच्या वतीने फक्त रॅलीची परवानगी काढण्यात आली होती. सभेची परवानगी न घेतल्याने गुन्हा दाखल झाला आहे. 19 एप्रिलला झालेल्या सभेचा गुन्हा 43 दिवसांनी दाखल झाला आहे. उमेदवार अर्चना पाटील व त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लातुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तानाजी सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर आमदारांसह महायुतीचे बडे नेते उपस्थित होते.