“…म्हणून या घटना वाढल्या”, बीड हत्या प्रकरणावर धीरेंद्र शास्त्रींनी मांडले मत

| Updated on: Dec 30, 2024 | 4:04 PM

त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता याप्रकरणी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

...म्हणून या घटना वाढल्या, बीड हत्या प्रकरणावर धीरेंद्र शास्त्रींनी मांडले मत
dhirendra shastri suresh dhas
Follow us on

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आज बीडमधील घटनेच्या निषेधार्थ सिंदखेड राजा येथे आज मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता याप्रकरणी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे कार्यक्रम पार पडला. यानंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांना बीड हत्याप्रकरणीही विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत आणि कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

“हा माझ्या आयुष्यातीला सर्वात अविस्मरणीय क्षण”

महाराष्ट्र हे आमचे सर्वात आवडते राज्य आहे. भारताचा हिंदू आणि युवा वर्ग हा जागृत होत आहे. देश एका नव्या क्रातींच्या दिशेने प्रवास करतो आहे. जळगाव जिल्ह्यातील लोकांचे जे प्रेम मिळालं, या ठिकाणचा बैलगाडीवरचा प्रवास, हा माझ्या आयुष्यातीला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. छोट्या छोट्या मुलांच्या कपाळावर छत्रपती शिवाजी महाराजांचे टिळा पाहून असं वाटलं…की… छोट्या छोट्या मुलांचे रूपाने वीर छत्रपती शिवाजी महाराज… हिंदवी स्वराज्याचा स्थापनेसाठी पुन्हा आले आहेत, असे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.

“गुन्हे करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी”

“देशात एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. मानस तर आहेत मात्र माणसांमधील माणुसकी मरत आहे. कमी होत आहे. आधीच्या काळात माणसं कमी होते, मात्र माणुसकी सर्वात जास्त होती. आज माणसे जास्त आहेत, मात्र माणुसकी मरण पावली आहे. माणुसकी मरत असल्याने कृत्य आणि अपराध हे वाढत आहेत. कुत्र्यासारख वागणं, माणसामध्ये प्रवेश करत असल्याने वारंवार छोट्या छोट्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, अपहरण यासारख्या गुन्हे वाढत आहेत. अशा प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत यासाठी शिक्षा व्हायला हवी. अशा गुन्ह्यांबद्दल जनजागृती व्हायला हवी. तसेच हे गुन्हे करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार, हेच यामागचे उपाय आहेत”, असेही बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले.

“हिंदू लोकांचं काही वाईट होवू नये एवढीच अपेक्षा”

“माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत आणि ते हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहेत. निश्चितच जो सनातनच काम करेल, तोच या देशावर राज्य करेल. कोणत्याही परिस्थितीत देशातल्या हिंदू लोकांचं काही वाईट होवू नये एवढीच अपेक्षा आहे”, असे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.