धुळे / 18 जुलै 2023 : सध्या पावसाळा सुरु असल्याने नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे वारंवार प्रशासनाकडून नदी, समुद्र, धबधबे आदि ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागात या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहेत. गावातील शाळकरी मुलं, तरुण सर्रास नदीवर अंघोळीची मजा घेताना दिसतात. मात्र हीच मजा जीवावर बेतत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना धुळ्यात उघडकीस आली आहे. मित्रांसोबत अरुणावती नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या 13 वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिरपूर शहराजवळील मांडळ शिवारात आज सकाळी मुलाचा मृतदेह आढळून आला. पीडित कुटुंब मूळचे सावळदे गावचे रहिवासी आहेत. मयत मुलाचे वडील शिरपूर आगारात चालक म्हणून कार्यरत असल्याने ते सध्या शिरपूरमध्ये राहतात. मयत मुलगा पाचवी इयत्तेत शिकत होता. सोमवारी दुपारी एक वाजता मुलगा मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी म्हणून घरुन निघून गेला.
मात्र संध्याकाळ झाली तरी मुलगा घरी परतलाच नाही. घरच्यांनी सर्वत्र शोध सुरु केला. मात्र मुलगा कुठेच सापडला नाही. यानंतर आज सकाळी थेट त्याचा मृतदेह मांडळ शिवारात आढळला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.