धुळे : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा चिंतेत आहे. साक्री तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे नदी (River) नाले दुथळी भरून वाहत आहेत. शेतीत पाणी शिरल्याने शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदाचा साक्री तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला असुन, ओला दुष्काळा जाहीर करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केले आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू असल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अख्यी पिकेच पाण्याखाली गेली आहेत.
गेल्या चार दिवसांपूर्वी साक्री तालुक्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली होती. त्यावेळेस देखील पंचनामे केले गेले नाहीत. मात्र आता नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असल्याने लवकरच पालकमंत्री मिळणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे. साक्री तालुक्यातील उंभड, वरदान्यासह परिसरात अतिदृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये सरासरीच्या दुप्पटपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अजून काही दिवस पावसाची संततधार सुरू राहणार असल्याने जे काही उरलेसुरले क्षेत्र आहे ते वाचवण्यासाठी आता शेतकरी धडपड करताना दिसत आहेत.