धुळे : धुळ्यात (Dhule) एक धक्कादायक घटना घडलीयं. धुळ्यात तहसील कार्यालयात अवैध वाळू उपसा प्रकरणी जमा केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण शहरात एकच चर्चा रंगलीयं. विशेष म्हणजे पळून नेलेले ट्रॅक्टर (Tractor) हे विना नंबर प्लेटचे असल्याचे दिसून आले. या घडलेल्या घटनेमुळे धुळ्यातील सरकारी कार्यालय रामभरोसे आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. यासर्व घटनेवर स्वत: तहसीलदार (Tehsildar) यांनीही बोलण्यास नकार दिला आहे.
तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर चोरीला गेल्याने याबाबत तहसीलदार गायत्री सेंदाने यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकाराबाबत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. या घडलेल्या प्रकारामुळे सरकारी कार्यालये किती सुरक्षित आहे? हा प्रश्न परत एकदा उपस्थित होतोयं. चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर बाबत मंडलाधिकारी रतनसिंग भिका राजपूत यांच्या फिर्यादीवरून आरोपी समाधान दगडू पाटील यांच्याविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर चोरीसंदर्भात आता अधिक तपास पोलिस प्रशासन करत आहे. सध्या शहरासह धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून तर काही ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या वाहनातून हे उपसा केले जात आहे, त्या वाहनांना नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे धुळ्यात महसूल प्रशासन किती जागरूक आहे याचा प्रत्यय येत आहे.
धुळ्यातील या सर्व प्रकारानंतर महसूल प्रशासन करतात तरी काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. तहसीलदारांसह महसूल प्रशासनाचे गौण खनिज व वाळू तस्करांना धाक राहिला नाही का? अशी परिस्थिती धुळ्यात निर्माण झाली आहे. त्यातूनच चोरट्यांची चक्क सरकारी कार्यालयातून जमा केलेली वाहने पळवून नेण्यापर्यंत मजल जात आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता सर्वसामान्य धुळेकर करत आहे.