धुळे : धुळे (Dhule) जिल्हात गेल्या काही दिवसांपासून जन्मदर कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारीच मैदानात उतरले आहेत. धुळे आणि साक्री तालुक्यांमध्ये सोनोग्राफी केंद्रांची (Sonography Center) तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता मासिक पथकाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. धुळे जिल्हात अचानक जन्मदर (Birth rate) कमी झाल्याने चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात एक हजार मुलांमागे 888 मुलींचा जन्म झाला आहे. साक्री तालुक्यात मुलींचा जन्मदर 877 आहे. शिरपूर तालुक्यात एक हजार 29 तर शिंदखेडा तालुक्यातील 1002 असा मुलींचा जन्मदर आहे. या दोन तालुक्यात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा अधिक आहे. तर धुळे आणि साखरी तालुक्यात जन्मदर कमी झाला आहे. अचानक जन्मदर कमी कशाने झाला, याची कारणे देखील शोधली जात आहेत.
धुळे आणि साखरी तालुक्यात जन्मदर कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील सोनोग्राफी सेंटरची तपासणी व स्टिंग ऑपरेशन करण्याचे आदेश दक्षता मासिक पथकाला बैठकीत दिले आहे. यादरम्यान कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे आता सोनोग्राफी सेंटरचे धाबे दणाणले आहेत, जन्मदर कमी झाल्याने स्वत: जिल्हाधिकारी याबाबत लक्ष ठेऊन आहेत.