धुळेः धुळे शहरात अवैध सावकारीला ऊत आला असून यातून अनेकांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. अशीच एक तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आदेशाने पोलीस उप अधीक्षक कातकाडे यांनी जुने धुळ्यातील (Old Dhule) एका सावकाराच्या घरी अचानक छापा टाकला. विमा एजंट (Insurance agent) असलेला व शहरात ‘ किंग’ नावाने परिचित असलेल्या अवैध सावकाराच्या घरी पोलिसांनी धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली. या अवैध सावकाराच्या घरातुन एकूण 1 कोटी 30 लाख 1 हजार 150 रुपयांची रोकड व 46 लाख 22 हजार 378 रुपये किंमतीचे 998.470 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच संबंधित गुन्ह्याशी संबधीत दस्तऐवज सौदा पावती गहाणखात, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात एलआयसी किंग (LIC king) म्हणून ओळखला जाणारा व दुसरीकडे पडद्याआड अवैध सावकरी गोरख धंदा चालवून आर्थिक शोषण करणारा मुख्य आरोपी राजेंद्र जीवनलाल बंब याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस प्रशासन अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,2011 डिसेंबर ते 2021 या दरम्यान मूळ तक्रारदार हे मुख्य आरोपी राजेंद्र जीवनलाल बंब (रा. गल्ली नंबर ७ जूने धुळे) यांच्याकडे खासगी नोकरीला होते. तक्रारदारांनी पैशांची अडचण असल्याने त्यांनी मुख्य आरोपीच्या नोंदणीकृत नसलेली जीपी फायनान्स कंपनी कांदिवली मुंबईच्या माध्यमातून व्याजाने पैसे घेतले. त्यानंतर आरोपी राजेंद्र बंब याने एलआयसी एजंटचा फायदा घेऊन तक्रारदारास कर्ज रकमेच्या दीडपट विमा पॉलिसी घेण्याच्या अटीवरच कर्ज देऊन वार्षिक 24 टक्के व्याज दराने पैसे वसूल केले तसेच कर्जापोटी वडिलांच्या घराचे मूळ कागदपत्र त्यासोबत पाचशे रुपये किंमतीचा कोरा स्टॅम्प पेपर व चेक वर सही घेऊन ठेवले.
जास्त व्याजासाठी तक्रारदाराला मूळ कागदपत्र आरोपी राजेंद्र बंब यांनी दिले नाही, त्यामुळे तक्रारदाराने आझादनगर पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आदेशाने होम डीवायएसपी कातकाडे यांनी जुने धुळ्यातील अवैध सावकारी आरोपीच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली तर या अवैध सावकाराच्या घरातून एकूण 1 कोटी 30 लाख 1 हजार 150 रुपयांची रोकड व 46 लाख 22 हजार 378 रुपये किंमतीचे 998.470 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच संबंधित गुन्ह्याशी संबधीत दस्तऐवज सौदा पावती गहाणखत, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी राजेंद्र बंब हा इतर कर्जदार त्यांचेही आर्थिक शोषण करून फसवणूक करत असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे, तसेच सह आरोपीने त्या सदर गुन्ह्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्यही केले आहे. तसेच राजेंद्र बंब याने कर्जदाराच्या मालमत्तेचे कागदपत्र गहाण, सौदा पावती करून ठेवून घेतले असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे संपर्क साधावा असे आव्हानही पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. तर अवैध सावकारी राजेंद्र बंब याला अटक करण्यात आली असून यासंदर्भात पोलीस प्रशासन अधिक तपास करीत आहे.