धुळे / मनेष मासोळे : धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावामध्ये एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या आहेत. वाढदिवसानिमित्त वापरली जाणारी आकर्षक मेणबत्ती या कारखान्यामध्ये बनवली जात होती. दुपारी पावणे 2 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली आणि या आगीत होरपळून या चौघी महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कळते. चौकशीअंतीच आगीचं नेमकं कारण समोर येईल, असं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयताला ताब्यात घेतल आहे. जखमींना नंदुरबार येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मयत महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.
निजामपूर परिसरातील चिखलीपाडा येथे 25 बाय 25 च्या एका खोलीत चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याचा कारखाना सुरु होता. त्या ठिकाणी साक्री तालुक्यातील जैताणे गावातील महिला कामगार कामाला आहेत. आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक त्या कारखान्यात शॉटसर्किट होऊन आग लागली. या आगीची ठिणगी चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) बनविण्याच्या कच्चा मालावर पडली. यामुळे ही आग आणखी भडकली.
आगीत त्या ठिकाणी काम करणार्या आशाबाई भैय्या भागवत, पूनम भैय्या भागवत, नैनाबाई संजय माळी, सिंधूबाई धुडकू राजपूत या चार जणींचा होरपळून मृत्यू झाला. तर संगीता प्रमोद चव्हाण ही महिला 70 टक्के आणि निकीता सुरेश महाजन ही 30 टक्के भाजली. या दोघींना उपचारासाठी नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचाराअर्थ दाखल करण्यात आले आहे.
हा कारखाना पुणे येथील रहिवासी असलेल्या रोहीणी कुवर यांच्या मालकीचा असून, या कारखान्याचा कारभार जगन्नाथ रघुनाथ कुवर हे पाहतात. जगन्नाथ कुवर यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, हा कारखाना चालविण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या कुवर यांनी घेतल्या होत्या का?, या कारखान्यात कुणी बालकामगार काम करीत होते का?, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.