धुळे – एकीकडे रोज शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे शिंदे गटात (Cm Eknath Shinde) सामील होत आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे राज्यभर निष्ठा यात्रा काढत कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तिकडे आता निष्ठापत्र देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले आहे . शिवसेनेचे काही पदाधिकारी शिंदे गटात गेले आहे . दुसरीकडे काही निष्ठावंत शिवसैनिक अद्यापही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत . त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार शिवसैनिकांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर निष्ठापत्र भरून दिले आहे . ही संख्या आगामी काळात वाढण्याची भूमिका ही शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटाचा वाढणार पाठिंबा ही ठाकरेंची प्रमुख अडचण ठरत आहे. कारण आमदारांनंतर आता खासदारांनीही शिंदे गटाची वाट धरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली. जिल्ह्यातून अपक्ष आमदार मंजुळा गावित जिल्हाप्रमुख डॉ . तुळशीराम गावित व महानगरप्रमुख सतीश महाले शिंदे गटात सहभागी झाले . राज्यभरात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होत आहे . या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असलेल्यांकडून 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपर प्रतिज्ञापत्र तसेच निष्ठापत्र लिहून घेतले जाते आहे . त्यानुसार जिल्हाभरात निष्ठापत्र भरून देण्याची मोहीम सुरू आहे . त्यानुसार आत्तापर्यंत अडीच हजार शिवसैनिकांनी निष्ठापत्र सादर केले आहे . जिल्ह्यातून पाच हजार निष्ठापत्र भरण्याचे नियोजन आहे . त्यानुसार गुरुवारी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी निष्ठापत्र सादर केले .
माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे . तसेच वंदनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि तत्त्वावर अढळ निष्ठा आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून , त्यांना बिनशर्त पाठिंबा आहे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करत आहे आणि या निष्ठेची पुनश्चः पुष्टी करत आहे . त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहील याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देतो आहे , असे निष्ठापत्रात नमूद आहे. मात्र राज्यभरातून अनेक कार्यकर्ते हे दिवसेंदिवस शिंदे गटात सामील होत आहे. आज विरोध करणारेच उद्या शिंदे गटातही दिसतात.