Gajanan Kirtikar : मातोश्री सोडून चूक केलीय का?; गजानन कीर्तिकर काय म्हणाले?

| Updated on: May 23, 2024 | 1:11 PM

मी राजकारणात आहे. 57 वर्षे शिवसेनेत आहे. बाळासाहेबांचा प्रभाव आमच्यावर आहे. आमच्या कुटुंबावर आहे. त्यामुळे सोडून जाऊ नका अशी त्यांची भावना आहे. माझी राजकीय गरज वेगळी आहे असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे.

Gajanan Kirtikar : मातोश्री सोडून चूक केलीय का?; गजानन कीर्तिकर काय म्हणाले?
शिवसेना नेते गजानन कीर्तिकर
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी माझा ( अमोल ) माझ्या मुलाला विरोध नाही मी त्याचा प्रचार केला असं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार या त्यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांची हक्कालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आणखीनच वाद निर्माण झाला आहे. त्यात गजानन कीर्तिकर यांची पत्नी विदीशा कीर्तिकर यांनी मिडीयाशी बोलताना काल शिंदेनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायला नको होती असे वक्तव्य केल्याने भर पडली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले गजानन कीर्तिकर यांनी माझ्या पत्नीचा राजकारणाशी संबंध नाही. तिला मिडीयाने विचारलं आणि तिने भाबडेपणाने सांगितले. त्याचा विपर्यास केला गेला असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्हाला मानसिक त्रास होत आहे. असा प्रसंग राजकीय जीवनात कुणाच्या येऊ नये. कारण मी एका पक्षाशी निष्ठेने काम करत आहे. त्या पक्षाच्या विरोधात माझा मुलगा लढत आहे. माझ्यावर हा प्रसंग आला आहे. कुटुंबाचा विषय पत्नीने सांगितला. दीड वर्षापूर्वी शिंदे गटात प्रवेश घेतला. अमोल पासून सर्व सांगत होते की तुम्ही पक्ष सोडू नका. इथेच राहा. त्यांनी त्यांचं मत मांडलं. पण मी गेलो. आता मी गेलो त्याची कारणंही अनेकवेळा सांगितली आहेत. ईडीचं आणि खोक्याचं कारण नाही असेही कीर्तिकर म्हणाले.

शिंदेंनी जीव धोक्यात घालून उठाव केला

गजानन कीर्तिकर पुढे म्हणाले की एकनाथ शिंदेंनी जीव धोक्यात घालून उठाव केला, 40 आमदारांना एकत्र आणलं. हिंदुत्व आणि आक्रमकता घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमच्या मनातील पक्ष भलतीकडे भरकटत चालला होता. भविष्यात तो प्रवास धोकादायक होता म्हणून आम्ही शिंदेंकडे गेलो. ज्या पद्धतीने ते संवाद साधत आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे शिवसेनेचं बळ उभं राहीलं. याचा अर्थ असं नाही की पक्षाला बदनाम केलंय असेही कीर्तिकर यावेळी म्हणाले.

तो माझा स्पर्धक नाही

शिशिर शिंदे म्हणाले की माझी हकालपट्टी व्हायला हवी. त्यांनी त्यांची भावना मांडली. तो ध्येयवादी शिवसैनिक आहे. तो छुपा अजेंडा घेऊन आलेला नाही. जो विचार करून मी आलो, तसाच तो विचार करून आला. तो सेन्सिटीव्ह आहे. त्याने वेगळा अर्थ घेतला. त्याने माझी हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्याने कळ लावतात तशी मागणी केली नाही. तो माझा स्पर्धक नाही. हा विपर्यास केला गेला आहे. मला या निवडणुकीत मानसिक त्रास झाला. पक्षासाठी जे करायचं होते ते मी केलं. आमच्या उमेदवारासाठी मी केलं असे कीर्तिकर यांनी सांगितले.

मी माझ्या मर्जीने येथे आलो

एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने शिवसेना उभी केली आहे. ती पाहून मी माझ्या मर्जीने येथे आलो आहे. ठरावीक उद्दिष्ट घेऊन आलो आहे. ही शिवसेना बळकट कशी होईल यासाठी प्रयत्न करेल. माझं ऊर्वरीत आयुष्य संघटनेसाठी देणार आहे. मी मातोश्री सोडून चूक केलेली नाही. मातोश्री जी सोडली ती विचारपूर्वक सोडली होती. विचार कुठला तो सांगितला. मला मातोश्रीकडून किंवा एकनाथ शिंदेंकडून काही मिळवायचं असं काही राहिलं नाही. विचारपूर्वक मातोश्री सोडली. हकालपट्टीचा विषय हा पक्षांतर्गत विषय आहे. काही नियम आहे. प्रक्रिया आहे. शिशिर शिंदे, रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे बोलावतील. निर्णय घेतील. स्पष्टीकरण मागतील. काही चूक झाली नाही. मी ज्या कारणासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलो, त्या संघटनेला मी कायमस्वरुपी बळकट करणार आहे. त्यांना मी साथ देणार असल्याचे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे.

निकालातून सर्व कळेल

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद किती आहे? कमी आहे की जास्त हे निवडणुकीनंतर कळेल. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात फूट पडली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दिलं आहे. जनता कुणाच्या बाजूने आहे हे निकालातून कळेल असेही कीर्तिकर यांनी म्हटले आहे. आम्ही जे काम करतो त्याची विभागणी केली आहे. एक समिती केली आहे. कुणाला कोणतं काम हवं. कोणतं मंडळ आहे, कुणाला किती गरज आहे. मला ते बघायला वेळ नाही. त्यामुळे अमोल आणि दोन तीन पदाधिकारी ते काम पाहत होते. नऊ वर्षे तोच काम पाहत होता. नऊ वर्ष निधी मिळत होता. खासदारकीचा निधी मिळत होता. त्यातून विकास कामे करत होतो. त्यासाठी हेल्पिंग हँड हवा होता. तो अमोल आणि संदीप सावंत होते. ऑफिसमधील लोक बघत होते असेही ते म्हणाले.

मी राजकारणात आहे. 57 वर्षे शिवसेनेत आहे. बाळासाहेबांचा प्रभाव आमच्यावर आहे. आमच्या कुटुंबावर आहे. त्यामुळे सोडून जाऊ नका अशी त्यांची भावना आहे. माझी राजकीय गरज वेगळी आहे. शिवसेनेचं भवितव्य शिंदे घडवतील म्हणून मी तिकडे गेलो. मी शिंदेंना जाऊन भेटणार आहे. त्यांना माहिती देणार आहे असेही गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे.