मुंबई: सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी या प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना?, अशी शंका सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. शेलार यांची ही मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मान्य केली असून केंद्रीय यंत्रणांच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार असल्याचं दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी जाहीर केलं. दरम्यान, केंद्रीय तपास अधिकारी असल्याचं भासवून व्यापाऱ्यांकडून वसुली केल्याप्रकरणी सौरभ त्रिपाठी यांना आधीच निलंबित करण्यात आलेलं आहे.
राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापाऱ्याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलबित केले होते. या कारवाईचे स्वागत करताना आशिष शेलार यांनी एका गंभीर बाबीकडे आज विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले.
या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.
ओम वंगाटे या पोलिस अधिकाऱ्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ओम वंगाटे हे पोलीस निरीक्षक आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप वंगाटे यांच्यावर आहे. खंडणीप्रकरणी ओम वंगाटे यांना अटक करत सोबत अन्य तीन अधिकाऱ्यांवरही खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2021 वर्षातील डिसेंबर महिन्यात अंगडिया व्यापार करणाऱ्यांना आयकराची भीती दाखवत पैसे उकळले होते. पोलिसांची वागणूक आणि पोलिस ठाण्यातील नोंद यात तफावत आढळ्याचं समोर आल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांचकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. उपायुक्त सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्थानकात न आल्यानं संशय बळावला. आता चौकशीतून इतरही अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या: