Badlapur Fire Accident during Diwali : दिवाळी हा सण आकर्षक रोषणाई, आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. सध्या मोठ्या उत्साहात जगभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतेषबाजी आलीच. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिवाळीत फटाके फोडायला आवडतात. अनेक वर्षांपासून दिवाळीत फटाके फोडण्याची परंपरा सुरु आहे. मात्र कित्येकदा फटाके फोडताना आणि दिवे लावताना मोठ्या दुर्घटना होतात. या दुर्घटनांमुळे जखमी होणाऱ्या किंवा मृत्यू होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यातच आता ऐन दिवाळीत बाल्कनीत रॉकेट पडल्याने घराला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. बदलापूरच्या खरवई परिसरात ही घटना घडली.
बदलापुरातील खरवई परिसरातील प्रेशियस हेरिटेज इमारतीत फटाके फोडताना उडवलेलं रॉकेट एका घराच्या बाल्कनीत जाऊन पडले. त्यामुळे घराला भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यावेळी घरात कुणीही नसल्याने कुणालाही इजा झाली नाही. मात्र घरातील काही साहित्य जळून खाक झालं.
बदलापूरच्या खरवई परिसरातील प्रेशियस हेरिटेज इमारतीत गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली. या इमारतीबाहेर कुणीतरी फटाके फोडताना उडवलेलं रॉकेट थेट 405 क्रमांकाच्या फ्लॅटमधील बाल्कनीत येऊन पडलं. त्यामुळे बाल्कनीत असलेल्या साहित्याने पेट घेतला. यानंतर तिथे मोठी आग लागली.
या आगीत बाल्कनीत असलेली पुस्तकं, सायकल आणि लाकडी साहित्य जाळून खाक झालं. यानंतर इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी ही आग विझवली. त्यामुळे मोठं नुकसान टळलं. मात्र या घटनेमुळे बदलापुरातील नागरिकांना धक्का बसला आहे. तसेच दिवाळीच्या दिवसात नागरिकांनी घर बंद करून जाताना बाल्कनीत कपडे, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, असं आवाहन अग्निशमन दलानं केलं आहे.