पतीकडून होणारा मानसिक त्रास, संशयी वृत्ती, चारित्र्यावरील चिखलफेक या सर्व गोष्टींना कंटाळून छत्रपती संभाजीनगर येथे एका महिला डॉक्टरने तिचं आयुष्यचं संपवलं. एमजीएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे हिने टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ माजली. गेल्या आठवड्यात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. जाण्यापूर्वी प्रतीक्षाने सात पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती, ती व्हायरल झाल्याने तिच्या पतीच्या,प्रीतमच्या काळ्या कृत्यांची यादीच लोकांसमोर आली. यामुळे घाबरलेला प्रीतम हाँ लपून बसला होता. परदेशात पळून जाण्याच्या त्याचा प्रयत्न होता. पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.
काल ( 29 ऑगस्ट) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा कोर्टात तणावाचे वातावरण होते. तेथे 200 पेक्षा अधिक वकील हजर होते. त्यांचा अतिशय आक्रमक पवित्रा होता, मात्र न्यायाधीशांनी सर्वांना समज देत कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आदेश देत सुनावणी घेतली. यावेळी प्रीतम याच्या सुरक्षेसाठी 18 पोलीस तैनात होते अशी माहिती सूत्रांनी दिली. न्यायलयाने प्रीतम याला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
शाईफेक होण्याची शक्यता पाहून कडक बंदोबस्त
डॉक्टर प्रतीक्षा हिच्या मृत्यूसाठी प्रीतम याचा संशयी स्वभावच कारणीभूत ठरला . तिने लिहीलेल्या सात पानी चिठ्ठीमधून तिची वेदना दिसून येते. तिचा झालेला छळ या चिठ्ठीतून तिने व्यक्त केला. प्रतीक्षाने आयुष्य संपवल्याची माहिती मिळताच प्रीतम घाबरला. पोलीस पकडतील या भीतीने तो तीन दिवस शेतात राहिला. त्यानंतर तो पडगेवामधील सुंदरनगर येथे चुलत मामाच्या घरी गेला. तेथून परदेशात पळू जाण्याचा त्याचा प्लान होता. मात्र पोलिसांनी त्यापूरवीचा त्याला बेड्या ठोकल्या. . पोलिसांनी त्याला इथूनच अटक केली आहे.पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता.
मात्र चिठ्ठीतून त्याची कृत्य समोर आल्याने त्याच्याविरोधात मोठ्या संतापाचे वातावरण होते. कोर्टात येताना त्याच्यावर शाईफेक तसेच हल्ला होऊ शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन प्रीतमला न्यायालयात आणताना कडकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तब्बल 18 पोलीस त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. मात्र तो कोर्टरूममध्ये येताच शेकडो वकील आले. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता, काहीही होण्याची शक्यता होती. अखेर न्यायाधीशांनी त्यांना समज दिली, कोणीही कायदा हाती घेऊ नका, अनुचित प्रकार घडता कामा नयेत असे निर्देश न्यायाधीशानी दिले.
प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर घेण्यात येईल असेही नमूद केले. प्रतीक्षाच्या मृत्यूसाठी आणखी कोण जबाबादर आहे, या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला आणि प्रीतमच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्याला 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
सातत्याने घ्यायचा संशय
प्रीतम सातत्याने प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचा मोबाईल तपासायचा. तिला येणारे फोन आणि त्यावरील मेसेजही तपासायचा. एवढेच नव्हे तर प्रीतमने तिच्या मोबाईलच्या लॉकलासुद्धा स्वत:ची फिंगरप्रिंट ठेवली होती. प्रतीक्षा कामावर गेल्यावर तो तिला सतत फोन करायचा. चुकून प्रतीक्षाने फोन घेतला नाही तर तिला शिवीगाळही करायचा. इतकं करूनही तो थांबला नाही. तो सतत प्रतीक्षाला तिचा मोबाईल नंबर बदलायला सांगायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याबाबत प्रतीक्षाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. विशेष म्हणजे प्रीतमचे लग्नापूर्वी अफेयर होते, तशी कबुलीच त्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. उलट प्रतीक्षाच कशी चुकीची होती हे तो सांगत होता. मृत्यूनंतरही तो प्रतीक्षाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता.