सांगली | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध जिल्ह्यात आंदोलन होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केलीय. तर, काही ठिकाणी आमदार, नेते यांचे बंगले आंदोलकांनी पेटवले. एकूणच शांततेने सुरु असलेल्या या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहेत. मराठा आंदोलक आता राज्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त करत आहेत. सांगलीमध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सांगलीतील विटा येथे साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा तिसरा दिवस सुरु आहे. उपोषण करणारे आंदोलक बुधवारी चांगलेच आक्रमक झाले. विटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या तसेच मराठा समाजाबद्दल बैताल वक्तव्य करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याला चप्पलने झोडपले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांना मराठा कृती समितीचे प्रमुख शंकर मोहिते यांनी समर्थन दिले आहे. शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विटा येथे सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी एक रावणरुपी पुतळा बनविला होता.
मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते, मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, महायुतीचे मंत्री छगन भुजबळ, रयत क्रांतीचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांचे फोटो या रावणरूपी प्रतिकात्मक पुतळ्यावर लावण्यात आले होते.
आंदोलकांनी आधी या पुतळ्याची अंत्यरात्रा काढली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलने झोडपले आणि नंतर त्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी सदावर्ते यांचा उल्लेख गाढव, नारायण राणे यांचा उल्लेख कोंबडी चोर आणि सदाभाऊ खोत यांचा उल्लेख कडकनाथ कोंबडी चोर असा केला. यावेळी आंदोलकांनी या सर्व नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.