महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटीचा संप चिघळविण्यात मोठा हातभार असणाऱ्या जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली- आटपाडीत जोरदार भाषण केले आहे. मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून अजिबात तोंड बारीक करु नका, संघर्षाचे दिवस आता संपले आहेत, आपलं सरकार आलंय आणि आपला लेक मुख्यमंत्री झाला आहे. आता ज्यांना संघर्ष करायचा आहे, त्यांना संघर्ष करू द्या, परंतू विरोधक देखील संघर्ष करण्याच्या स्थितीत राहिलेले नाहीत अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील आटपाडी येथे केली. आज सांगलीत त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
मला नेहमी म्हणायचे की मागच्या दाराने आला आहे, पण आता विधानसभेच्या पुढचं दारावर लाथ मारून आत गेलो आहे. मी मंत्री जरी झालो नसलो तरी माझा रुबाब मंत्र्यासारखा, फक्त मागे पुढे पोलीस गाडी नाही एवढंच असेही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले. विधान सभा कुठे आहे, मंत्रालय कुठे आहे, मुंबईमध्ये आम्ही विधानसभा कधी पाहिली नव्हती,मंत्रालय कधी बघितलं नव्हतं, कुठे मंत्री बसतात,याचा देखील आपल्याला थांग-पत्ता नव्हता. आपण आपण खूणगाठ बांधली होती,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या हक्काने आपण काम केले असेही ते म्हणाले.
आपण साल 2006 मध्ये आटपाडीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची शाखा काढून राजकारणाची सुरुवात केली.तेव्हा गोपीचंद पडळकर धनगरांचा नेता आहे,असं काही जण म्हणायचे. पण, आटपाडी खानापूर मधल्या लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून माझ्यासाठी पहिला स्लॅब टाकला आणि जतच्या माझ्या मायबाप जनतेने शिखर बांधले आता कोणी तर कळस चढवतील असेही पडळकर यावेळी म्हणाले.
मला जत विधानसभेचे तिकीट देऊ नये म्हणून अनेकांनी जंग- जंग पछाडले होते. परंतू जतकरांना माझा शब्द आहे, ज्या भावनेने तुम्ही मला आमदार केलं , माझा सन्मान केलाय, मी आता माझ्या आयुष्यामध्ये जतच्या मातीचा सन्मान वाढेल असेच काम करणार असे गोपीचंद पडळकर यांनी यावेळी सांगितले. आटपाडी ही माझी जन्मभूमी आहे, आता आटपाडी बरोबर जत ही माझी कर्मभूमी आहे असेही पडळकर यावेळी म्हणाले.
एक लाखाच्या फटाकड्या उठवल्याशिवाय मी कधी जेलमध्ये दाखल झालो नाही. जेलमध्ये जाताना आणि जेल बाहेर येताना आपण फटाकडया उडवल्या. जतमध्ये सगळे नेते माझ्या विरोधात गेले पण जनता माझ्याबरोबर होती. तुम्ही किती जरी आला, तरी आम्ही पळणारे नाही. महाविकास आघाडीचे सरकार होतं आणि माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल झाला. एसटीचा आझाद मैदानावर आंदोलन सुरू होतं आणि इथल्या एसपीने मला अटक करण्याचा फर्मान सोडले. मी आझाद मैदानावरच होतो, पण तुम्ही माझ्यासोबत असल्यामुळे मला अटक करण्यात धाडस झालं नाही असेही पडळकर यावेळी म्हणाले.
आमची सत्ता गेल्यावर आम्ही ताकतीने विरोधात लढलो. महाविकास आघाडीची सत्ता गेली,मी आता त्यावर काही बोलणार नाही असेही पडळकर यांनी सांगत पण कोणाच्यात हिंमत आहे का सरकार विरोधात लढायची? जयंत पाटलांच्यात हिंमत आहे का सरकार विरोधात लढायची ? जयंत पाटील सांगली जिल्ह्याचे नेते आहेत त्यांच्यात आता सरकारविरोधात लढाईची हिंमत आहे का ? लढणं हे रक्तात असावे लागते,हे लोक लगेच वळचणीला पळतात, हे लढूच शकत नाहीत.पण त्याची आपण चिंता करायची नाही, वळचणीला कोण जात असतात…साप,उंदीर, वाघ कोणाच्या वळचणीला जात नाही. आता आपला संघर्ष संपला आहे असेही ते म्हणाले.
बारामतीमध्ये माझे डिपॉझिट जप्त झाल्याने मी खूप शिकलो,माझ्याकडे कोण कशासाठी आला आहे हे मला कळतं.राजकारणात पडायचे-उठायचं असं सगळं चालू होतं, पण जतकरांनी ताठ मान केली,त्यामुळे मी आता रुबाबात फिरतोय आता बोला मी तोंड द्यायला तयार आहे,पण आता बोलायचं कोणाच्या विरोधक सगळं विस्कटून गेले आहेत असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.