मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येत आहे. इंदू मिलच्या 12 एकर जागेत सुमारे 450 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारला जाणारा आहे. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. पण, प्रत्यक्षात फेब्रुवारी 2018 मध्ये या स्मारकाच्या कामाला सुरवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या स्मारकाच्या कामाला वेग देऊन पुतळ्याच्या मंजुरीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी आंबेडकर जनतेमधून होत होती. अखेर, राज्यसरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली आहे.
दादरच्या इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये 100 फूट उंचीची पादपीठाची इमारत उभारण्यात येणार आहे. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा बसविण्यात येणार आहे. स्मारकाच्या इमारतीचे 80 फुटांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पुतळा उभारणीचे काम सुरु होणार आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याची 25 फुटी प्रतिकृती तयार करण्याचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मात्र, पुतळ्याच्या प्रतिकृतीला राजसरकारने अद्याप मंजुरी दिलेली नसल्यामुळे पुढील काम रखडले आहे. त्यामुळे राजसरकारने आता ही प्रतिकृती फायनल करण्यासाठी 14 जणांची समिती नेमली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदू मिल येथे एक बैठक नुकतीच घेण्यात आली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवर व्यक्ती यांनी पुतळ्याची प्रतिकृती पाहून पुतळा अंतिम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ही समिती नेमण्यात आली आहे.
केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, सुलेखा कुंभारे यांच्यासह आमदार भाई गिरकर, यामिनी जाधव, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, पिपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष जोगेन्द्र कवाडे, भारतीय बौद्ध महासभेचे भिमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजेंद्र गवई, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आणि सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत भिवा भंडारे यांचा या समितीत समावेश आहे.
येत्या ६ आणि ७ एप्रिलला ही समिती गाझियाबाद येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २५ फुटी पुतळ्याची प्रतिकृती पाहणार आहेत. ६ तारखेला मुंबई येथून दिल्लीला जाऊन त्यानंतर ही समिती गाझियाबाद येथे जाणार आहे. येथे पाहणी करून ही समिती पुन्हा दिल्लीमार्गे मुंबईला परत येणार आहे. या समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पुतळाच्या प्रतिकृतीला मंजुरी देईल आणि त्यानंतर हे रखडलेले काम पूर्णत्वास येईल अशी माहिती माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.