मुंबई : आजपासून भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येणार असून ते टप्प्याटप्प्यानं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार. भारतात अधिकृतपणे लस घेतल्यानंतर दारू पिण्यासंबंधित कोणती घोषणा करण्यात आलेली नाही. असं असलं तरी, जगभरातील तज्ञ लोकांना लस घेण्यापूर्वी आणि नंतर थोडी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाची लसी घेण्याच्या आधी आणि नंतर अल्कोहोलपासून लांब राहाण्यासोबतच अनेक गोष्टी बाळगनं गरजेचं आहे. अल्कोहोलचा प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो आणि अल्कोहोल रोगप्रतिकार शक्ती कमी करते. कोरोना लस ही रोग प्रतिकारशक्तीवर काम करते. त्यामुळे, आरोग्य तज्ञ म्हणतात की लसी घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर काही दिवस अल्कोहोलचं सेवन करू नये.
किती दिवस काळजी घ्यावी लागणार
लस घेतल्यानंतर किती दिवस मद्यपान करू नये यावर तज्ञांचं भिन्न मत आहे. गेल्या महिन्यात रशियाच्या आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं होतं की स्पुतनिक व्ही लस घेतल्यानंतर 2 आठवड्यांपूर्वी आणि 6 आठवड्यांपर्यंत लोकांनी अल्कोहोल पिऊ नये कारण या विषाणूविरूद्ध लढा देण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ही लस तयार करणारे डॉक्टर अलेक्झांडर जिन्टबर्ग यांनी ट्विट करून तीन दिवस खबरदारी घेण्याबाबत सांगितलं होतं. त्यांनी असेही ट्विट केलं होतं की, “एका ग्लास शैम्पेनमुळे कोणालाही नुकसान होत नाही, रोगप्रतिकारक यंत्रणेवरही त्याचा परिणाम होत नाही.” दुसरीकडे, यूकेच्या आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे की लस लावण्यापूर्वी आणि एक दिवस आधी मद्यपान करू नये.
मद्याचं प्रमाण
काही आरोग्य तज्ञ म्हणतात की जर तुम्ही संतुलित प्रमाणात मद्याचं सेवन केलं तर तुम्हीला त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. जर जास्त प्रमाणात मद्यपान केलं (स्त्रियांसाठी दिवसातून एकापेक्षा जास्त आणि पुरुषांसाठी दोनपेक्षा जास्त ग्लास), तर तुम्ही ते कमी केलं पाहिजे.
या गोष्टींपासून दूर रहा
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लस घेतल्यानंतर शुगर ड्रिंक, प्रोसेस फुड, एनर्जी ड्रिंक्स, फास्ट फूड किंवा मद्यपी पदार्थांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. चायना ग्लोबल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक शेंगन यांच्या अहवालानुसार लठ्ठपणा वाढण्यास अति प्रमाणात अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, उच्च साखर आणि फॅट्सचं सेवन जबाबदार आहे.