Buldana : बळीराजा दुहेरी संकटात; सुरुवातीला अतिवृष्टीचा फटका तर आता पावसाची दडी

| Updated on: Aug 31, 2022 | 10:08 AM

सोयाबीन (soybean) शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाने मान टाकलीये. याचा परिणाम हा शेगांवर होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Buldana : बळीराजा दुहेरी संकटात; सुरुवातीला अतिवृष्टीचा फटका तर आता पावसाची दडी
Follow us on

बुलडाणा : यंदा जून , जुलै आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत चांगला पाऊस (rain) पडला.  मात्र त्यानंतर अचानक पावसाने मारलेल्या दडीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पाऊस पडला नसून, पिके सुकून चालली आहेत. चिखली (Chikhli) तालुक्यात सोयाबीनचे पीक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. सोयाबीन (soybean) शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाने मान टाकलीये. याचा परिणाम हा शेगांवर होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

या वर्षी राज्याच्या काही भागात जूनमध्ये तर काही भागात जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे राज्याच्या काही भागात जूनमध्ये तर काही भागात जुलैमध्ये शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली.  जुन, जुलै महिन्यात पाऊसही चांगला पडल्याने पिकेही चांगली बहरात आली.

मात्र ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावून दाणादाण उडविली. मात्र त्यानंतर पाऊसच पडला नसल्याने पिके सुकून चालली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या दोन तीन दिवसांपासून कडक उन पडत असून, उन्हामुळे जमीन तापायला सुरुवात झाली आहे. एक तर  पाऊस नाही आणि दुसरीकडे जमीन तापत असल्याने याचा मोठा फटका हा सोयाबीनला बसला आहे. सध्या सोयाबीनला शेंगा लागण्याचा हंगाम आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने त्याचा फटका हा पिकावर होण्याचा अंदाज आहे. पाण्याभावी शेंगा गळण्यास सुरुवात झालीआहे.

शेतकरी दुहेरी संकटात

शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. जुन आणि जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला. हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. अशाही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना शक्य होते त्यांनी दुबार पेरणी केली.

मात्र त्यानंतर ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाने ओढ दिली. पावसाने दिलेल्या ओढीमुळे पिके सुकून चालली आहे. याचा सर्वात मोठा फटका हा सोयाबीन पिकाला बसला आहे.