नाशिक : वातावरणात बदल झाल्याने राज्यात उष्णतेची लाट आल्याने कृषीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्याचा पारा चाळीशी पार गेल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. नागरिक वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाल्याने थंड पेय पिऊन शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करतांनाचे चित्र सध्या निफाड मध्ये दिसत आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळीने निफाड तालुक्यात कहर केला आहे. अशातच आता उन्हाचा तडाखा देखील बसू लागल्याने निफाडकरांना उन्हासह पाऊसचा अनुभव भर उन्हाळ्यात येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने उकड्यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यात कधी न जाणवणारे कमाल तापमानाचा पारा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात चाळीशी पार गेल्याची नोंद झाली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
या वाढत्या उष्णतेमुळे घामाच्या धारा लागत असल्याने नागरिक भलते हैराण झाले आहे. सकाळी उन्हाचा तडाखा तर संध्याकाळी ढगाळ हवामान तयार होत असल्याने या विचित्र हवामानाचा सामना निफाडकरांना करावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
या प्रचंड उकड्यापासून शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिक थंडपेय पिण्यासाठी दुकानामध्ये गर्दी केली आहे. मागील आठवड्यापासून दिवसा कडक्याचे ऊन आणि रात्री अवकाळी पाऊस असा दुहेरी अनुभव नागरिकांना येत होता.
एप्रिल महिण्यात शक्यतोवर चाळीशी पार तापमान जात नाही. यंदाच्या वर्षी विचित्र हवामानाचा सामना नागरिकांना करावा लगत आहे. रेकॉर्ड ब्रेक थंडी असणाऱ्या शहरात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हात नागरिकांनी शीतपेयाचा आधार घेण्यास सुरवात केली आहे.
नाशिक जिल्हा तसा थंडीच्या काळात रेकॉर्ड ब्रेक थंडीमुळे संपूर्ण देशात ओळखला जातो. थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख असली तरी त्यापेक्षा अधिकची थंडी निफाड मध्ये असते. तर पाऊस देखील नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडत असल्याने यंदाच्या वर्षी उन्हाळा सुद्धा चर्चेत आला आहे.
नाशिकच्या निफाड येथे गहू संशोधन केंद्र आहे. तिथे कमाल आणि किमान तापमानाची नोंद होत असते. यंदाच्या वर्षी एप्रिल महिण्यातच पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तापमानाचे रेकॉर्ड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होत असल्याचे चित्र आहे.