आदिवासींच्या होळी उत्साहावर ‘अवकाळी’ विरजण, डोळ्या देखत गोवऱ्यांचा चिखल पाहून…

| Updated on: Mar 07, 2023 | 10:10 AM

नाशिक गंगाघाट परिसरात होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या विकण्यासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

आदिवासींच्या होळी उत्साहावर अवकाळी विरजण, डोळ्या देखत गोवऱ्यांचा चिखल पाहून...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : होळीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे होळी साजरी ( Holi Festival ) करण्यासाठी लागणाऱ्या गोवाऱ्या घेऊन आलेल्या आदिवासी बांधवांना मोठा फटका बसला आहे. खरंतर नाशिक शहरात ( Nashik News ) आदिवासी भागातील नागरिक गोवऱ्या विकण्यासाठी येत असतात. त्याची लगबग अनेक महिन्यांपासून सुरू असते. अशातच रामकुंड परिसर, गंगापुर रोड या परिसरात आदिवासी बांधव गोवऱ्या विक्रीसाठी घेऊन बसतात. रविवारी आणि सोमवारी दोन्ही दिवस गोवऱ्या विक्रीसाठी आलेल्या आदिवासी बांधवांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अक्षरशः गोवऱ्या भिजल्याने त्याचा चिखल झाल्याने आर्थिक फटका बसला आहे.

रविवारी मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गंगाघाट आणि शहर परिसरात गोवऱ्यांचा अक्षरशः चिखल झाला होता. हजारो रुपयांचे नुकसान झाले आणि डोळ्या समोर गोवऱ्यांचा चिखल झाल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.

नाशिक शहरात खरंतर मोठ्या जल्लोषात होळी साजरी केली जाते. दिवसभर गोवऱ्या खरेदीची लगबग असते. त्यासाठी प्रत्येक नागरिक गोवऱ्या खरेदीसाठी येत असतो. होळीत गोवऱ्या टाकून नैवद्य दाखवून पूजा करत असतो.

हे सुद्धा वाचा

यंदाच्या वर्षी अचानक मुसळधार पाऊस झाल्याने गंगाघाटावर पाणी वाहू लागले होते. यावेळी विक्रीसाठी ठेवलेल्या गोवऱ्यांचा ढिगाऱ्या खालून पाणी वाहू लागल्याने अक्षरशः चिखल झाला होता त्यामुळे होळीच्या सणावर अक्षरशः विरजण पडल्याचे पाहायला मिळाले.

खरंतर पोटच्या पोराप्रमाणे काही महिन्यांपासून सांभाळलेल्या गोवऱ्या डोळ्यासमोर त्यांचा चिखल झाल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रु वाहू लागले होते. इतकेच काय तर दोन पैसे कमविण्याकरिता शहरात आलेल्या आदिवासी बांधवांच्या पदरी निराशा कोसळली आहे.

गौरी पटांगण येथे खरंतर होळीच्या काही दिवस अगोदर आदिवासी बांधव गोवऱ्या घेऊन दाखल होतात. मात्र, नागरिक होळीच्या दिवशीच खरेदीला यतेयत. त्यामुळे अनेक दिवस गोवऱ्या सांभाळण्यापेक्षा वेळेवर खरेदी करण्याचा कल नागरिकांचा असतो.

मात्र, त्याचाच फटका बसल्याने नागरिकांनी माणुसकीचा हात म्हणून अधिकच्या किमतीने गोवऱ्या खरेदी करण्याची मोहीम सोमवारी दिवसभर सुरू होती. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या डोळ्यात आलेले अश्रु नाशिककरांच्या माणुसकीने काही प्रमाणात पुसण्याचे कामही झाले.

मात्र, दरवर्षी मोठ्या आनंदाने होळी उत्सव साजरी करण्यासाठी लागणाऱ्या गोवऱ्या घेऊन आलेल्या आदिवासी बांधवांच्या आनंदावर मुसळधार पावसाने विरजण पडले असून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असून यंदाचा होळी उत्सव आदिवासी बांधवांना मोठा आर्थिक फटका देऊन गेला आहे.