मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे (NCB)माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. समीर वानखेडे हे ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीने वानखेडे यांच्याविरोधात PMLA कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणा लवकरच त्यांना चौकशीसाठी बोलावू शकते.सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरच्या आधारे ईडीने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
आर्यन खान केसनंतर वानखेडे चर्चेत
2021 सालच्या ऑक्टोबर मिहन्यात कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर वानखेडे हे सीबीआयच्या निशाण्यावर आले होते. आणि तपासाच्या प्रकरणाला वेग आला होता. कथित ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह अन्य काही जणांना अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्याला क्लीन चीट देण्यात आली होती. याप्रकरणामुळे वानखेडे चर्चेत आले होते.
आता ईडीने समीर वानखेडे यांच्याव्यतिरिक्त, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तीन अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यातील चौकशीसाठी समन्स बजावले असून त्यात दक्षता अधीक्षक कपिल यांचाही समावेश आहे. या अधिकाऱ्यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. याआधीईडीने काही लोकांची चौकशीही केली आहे.
वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव
याचदरम्यान, समीर वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी आणि संभाव्य अटकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे यांनी ईडीच्या कारवाईबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली असून, ईडीची ही अचानक कारवाई म्हणजे २०२३ मध्ये नोंदवलेल्या सीबीआय एफआयआर आणि ईसीआयआरच्या आधारे सूडबुद्धी आणि द्वेषभावना आहे, असे म्हटले होते.
आर्यन खानला मिळाली होती क्लीन चीट
2021 साली कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर, NCB ने एक विशेष तपास पथक (SET) स्थापन केले होते. ज्यामध्ये वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासात काही त्रुटी आढळल्या होत्या. सीबीआयने एसईटी अहवालाच्या आधारे वानखेडे आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर पाच जणांना ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट दिली आणि त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली.
खंडणी मागितल्याचा आरोप
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समीर वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध मे 2023 मध्ये, सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्यांनी पहिला हप्ता म्हणून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यावेळी सीबीआयने 29 ठिकाणी छापे टाकले होते. समीर वानखेडे यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी आणि कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.