कोल्हापूर : जिल्ह्यातील खासदार धर्यशील माने (Dhairyashil Mane) यांच्या रूकडी गावांमध्ये धनगर समाजाच्या काही नेते मंडळींनी त्यांच्या समाजातील आठ कुटुंबांना वाळीत टाकले आहे. यामध्ये एका आर्मीतील जवानाच्या (Army Jawan) कुटुंबालाही वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबाबरोबर कोणी बोलायचे नाही, त्यांच्याकडून काही साहित्य खरेदी करायचे नाही. यांच्या सुखात दुःखात कोणी जायचे नाही. जर गेले तर त्या कुटुंबाला पाच हजार रुपये दंड केला जातो, असा आरोप धनगर समाजातील शिणगारे कुटुंबांनी केला आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रूकडी गाव हे सदनशील गाव म्हणून ओळखले जाते. माजी खासदार बाळासाहेब माने व विद्यमान खासदार धर्यशील माने यांच्या गावामध्ये हा प्रकार घडला आहे. रुकडी गावातील माळावर असणाऱ्या धनगर मळ्यातील गणेश गल्लीमधील आठ कुटुंबांना त्यांच्यात समाजातील अध्यक्ष काशिनाथ शिणगारे यांनी आठ कुटुंबांना वाळीत टाकले आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून या कुटुंबाबरोबर कोणी बोलायचे नाही, देवळात यायचे नाही, शाळेमध्ये त्यांच्या मुला-मुलींबरोबर बोलायचे नाही. जर कोणी बोलले तर त्यांना तीन ते पाच हजार रुपये दंड केला जातो व त्या कुटुंबालाही वाळीत टाकले जाते. कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिकडे शाहू महाराजांचे शंभरावी शताब्दी महोत्सव पूर्ण जिल्हा साजरा करत असताना रुकडी गावात वाळीत टाकण्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
धनगर समाजातील आठ कुटुंबांनी याची तक्रार जिल्हाधिकारी पोलीस मुख्यालय यांच्याकडेसुद्धा केली आहे. पोलीस महासंचालकांनी अर्जाची दखल घ्यावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत. पण हातकणंगले पोलिसांनी दखल न घेता तक्रारदारांनाच दमदाटी केली आहे. त्यामुळे आम्हाला कोण न्याय देणार, असा सवाल शिणगारे परिवाराने केला आहे. अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी या शिणगारे कुटुंबाकडून होऊ लागली आहे.
रुकडी गावात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. याच गावांमध्ये माळावर असणाऱ्या शिणगारे गणेश नगर गल्लीमध्ये संपूर्ण धनगर समाज राहतो. याच धनगर समाजातील देवेन्द्र शिंणगारे हे आर्मी जवान गेल्या अठरा वर्षांपासून देशसेवा बजावत आहेत. गेल्या एक महिन्यापासून देवेंद्र शिंणगारे हे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी, कोल्हापूर पोलिसांकडे लेखी तक्रारही केली आहे. पण त्याची दखल कोणी घेत नाही. एका आर्मीच्या जवानाबरोबर असे होत असेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय, असा सवाल त्यांनी केला आहे. न्याय मिळाला नाही, तर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.