शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा कुणी केला गेम? ते चार नेते कोण? कुणावर होत आहेत आरोप, प्रत्यारोप?

| Updated on: Dec 11, 2023 | 10:12 PM

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बैठकांमध्ये त्यावेळी राऊत आघाडीवर होते. या बैठकीतील एक मोठी माहिती संजय राऊत यांनी उघड केली. एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं आणि ते झाले असते तर आज त्यांची भूमिका वेगळी असती.

शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा कुणी केला गेम? ते चार नेते कोण? कुणावर होत आहेत आरोप, प्रत्यारोप?
AJIT PAWAR, SANJAY RAUT AND CM EKNATH SHINDE
Follow us on

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : एकनाथ शिंदे यांच्या महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदावरून खासदार संजय राऊत यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय. 2019 ला विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार होते. मात्र, त्यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या चार नेत्यांनी विरोध केला होता. मुंबईतील ताजलँड हॉटेलच्या लिफ्टमध्ये या नेत्यांनी शिंदे यांच्या नावाला नकार दिला. एका नेत्याने तर ‘मी एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही असं सांगितलं. त्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत’ असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

2019 च्या विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीने लढवल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोबत प्रचार केला. तर, फडणवीस मी पुन्हा येईन म्हणतच होते. मात्र, निकाल लागताच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली. त्याला भाजपने नकार देताच ठाकरेंनी कट्टर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बैठका सुरू केल्या. महाविकास आघाडीच्या निर्मितीसाठी संजय राऊत आणि शरद पवारांनीच पुढाकार घेतला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बैठकांमध्ये त्यावेळी राऊत आघाडीवर होते. या बैठकीतील एक मोठी माहिती संजय राऊत यांनी उघड केली. एकनाथ शिंदे यांना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं आणि ते झाले असते तर आज त्यांची भूमिका वेगळी असती. परंतु, आज जे एकनाथ शिंदेंबरोबर त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं काम करताहेत त्याचाच त्यांना विरोध होता असे राऊत यांनी सांगितलं.

आघाडीच्या तिन्ही बैठकीमध्ये त्यांचा एकच हेका होता आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही. त्यात अजित पवार होते, वळसे पाटील होते, जयंत पाटील होते आणि सुनील तटकरे होते. ताजलँड हॉटेलमध्ये एका बैठकीनंतर खाली लिफ्टमधून उतरल्यावर अजित पवार यांनी मला खाली पकडून सांगितलं, बघा एकनाथ शिंदेच्या हाताखाली मी काम करणार नाही असा गोप्यस्फोट राऊत यांनी केलाय.

संजय राऊत यांनी अजित दादांकडे बोट दाखवलं असलं तरी या संदर्भात स्वतः एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच विधानसभेतल्या पहिल्याच भाषणात उल्लेख केला होता. आपण अजित पवारांना विचारणा केली होती. त्यावेळी असा कुठलाही विरोध नव्हता असे दादाच बोलले होते. हे ही शिंदेंनी भर सभागृहात सांगितलं. मी कधीही कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती. करणारही नाही. मग मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं ते बोलले आमचा कोणाचाच विरोध असण्याचं कारणच नाही. तुमच्या पक्षाचा तो निर्णय होता असे दादांनी सांगितल्याचे शिंदे म्हणाले होते.

संजय राऊत यांच्या या दाव्यावरून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मात्र चांगलाच टोला लगावलाय. संजय राऊतांनी बोलण्यापेक्षा आमच्याकडं प्रमुख होते माननीय उद्धवजी ठाकरेसाहेब होते. त्यावेळी हे माननीय उद्धव ठाकरे साहेब जर बोलले असते. तर त्यावर आम्ही विश्वास ठेवला असता. संजय राऊतांचं कसं आहे ते आज एक बोलतात उद्या दुसरं बोलतात. मग हे अडीच वर्ष का लागतील? साडेतीन वर्ष का लागले संजय राऊतांना सांगायला? ज्या सोयीस्कर गोष्टी असतील स्वतःला त्या वळवून फिरवून बोलायच्या ही संजय राऊतांची जुनी सवय आहे, अशी टीका देसाई यांनी केलीय.

ठकारे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही विधानसभेत शिंदे आणि फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांना मुख्यमंत्री करा आमचाही पाठिंबा आहे असं खुलं आव्हान भास्कर जाधव यांनी दिलंय. तुम्ही बोला. आत्ता दादांना मुख्यमंत्री करा. पाठिंबा देतो. सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला दादांना आत्ता मुख्यमंत्री करा काय असे आव्हान जाधव यांनी दिलंय.