शिवसेनेचा ताबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतरही शिवसेनेच्या तिजोरीतील 50 कोटी रुपये ठाकरे गटाने स्वत:कडे ठेवून घेतले आहेत. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांना शिवसेना, बाळासाहेबांचे विचार नको, धनुष्यबाण नको, त्यांना फक्त आणि फक्त पैसे पाहिजेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या खात्यातले जनतेचे पैसे, शिवसेनेचे 50 कोटी देखील काढून घेतले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात सभा घेत असून ठाकरे गटाचा उल्लेख नकली शिवसेना असा करत आहेत. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरी शिवसेना ही मोदीं बरोबर आहे. मोदी म्हणाले ते खरंच आहे. कारण बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत. धनुष्यबाण आमच्याबरोबर आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले आणि सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका सोडली, ती खरी शिवसेना होऊच शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लोक प्रभावित होऊन येत आहेत
ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज अनेक लोक विश्वासाने प्रवेश करत आहेत. काल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे. या सर्व लोकांना जी काही वागणूक मिळत होती आणि आपल्या शिवसेनेत मिळणारी वागणूक याचा जो काही लेखाजोखा आहे त्या या प्रवेशांना कारणीभूत ठरत आहे. विकास आणि विकास आज आमचा अजेंडा आहे. आम्ही केलेली कामं आणि मोदी साहेबांनी केलेल्या कामावर प्रभावित होऊन लोक आमच्याकडे येत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात
एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांचे विचार पटत असल्याने अनेकजण आमच्याकडे विश्वासाने येत आहेत. हा कारवाँ अजून मोठा होणार आहे. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणी मोठा आणि छोटा नाही, इथे कोणी मालक नाही, नोकर नाही. तिकडे मालक नोकराप्रमाणे वागवत होते. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. आता आहे ते सहकाऱ्यांना घरगडी समजत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.