मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिल्लीत येत्या 14 फेब्रुवारीला महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. कारण येत्या 14 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. ही सुनावणी नियमित स्वरुपात सुरु होणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाविषयी सुनावणी पूर्ण झालीय. दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झालाय. निवडणूक आयोगाकडून कधीही या प्रकरणाचा निकाल जाहीर होऊ शकतो. या घडामोडींदरम्यान सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद होतो हे पाहणं ते महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गट येत्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीत काय भूमिका मांडणार याबाबतची माहिती ‘टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गट येत्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीत नवाब रबिया केसचा संदर्भ देत युक्तिवाद करणार आहे. अपात्र आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षकांकडे द्या, असा युक्तिवाद शिंदे गट करणार आहे. त्यासाठी शिंदे गटाच्या वकिलांकडून नबाव रबिया केसचा अभ्यास सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
अपात्र आमदारांबद्दलचे अधिकार विधानसभा अध्यक्षकांकडे आहेत. त्यामुळे हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं जावं. विधानसभा अध्यक्षांना त्याबद्दलचे निर्णय घेऊ द्यावे, अशी मागणी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय.
गेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे द्यावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता शिंदे गट अपात्र आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्षकांडे वर्ग करण्याची मागणी करणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेच्या 14 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण एकनाथ शिंदे गटाने थेट पक्षातून बंडखोरी करत थेट पक्षावर दावा सांगण ही देशातील राजकारणातील दुर्मिळ घटना आहे. याआधी देखील काँग्रेससोबत असं घडलं आहे.
याशिवाय उत्तरेकडील राज्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. पण शिवसेनेतली घटना आजच्या घडीसाठी सर्वात महत्त्वाची आहे. कारण या सुनावणीत जो निकाल येईल त्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील राजकीय घडामोडी घडणार आहेत.
सु्प्रीम कोर्टात 16 अपात्र आमदारांच्या याचिकेचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूला लागला तर महाराष्ट्रातील शिंदे सरकार कोसळू शकतं. दुसरीकडे निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर हा ठाकरे गटासाठी सर्वात मोठा फटका असेल.