नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी त्यांच्या मुख्यमंत्री होण्यामागे कुणाची कृपा आहेत. याबद्दल नाशिकमध्ये (Nashik) एक विधान केले आहे. या विधानावरून वेगवेगळी चर्चा देखील सुरू झाली आहे. नाशिकमध्ये नव्याने उभारण्यात आलेले स्वामीनारायण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलतांना, मी मुख्यमंत्री झालो ही “स्वामीनारायण” यांचीच कृपा असल्याचे म्हंटले आहे. नाशिकच्या तपोवन येथे बी.ए.पी.एस. स्वामीनारायण मंदिर (Swaminarayan Temple) वेदोक्त मुर्तीप्रतिष्ठाविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मंदिराच्या भूमीपूजण सोहळ्याला देखील येण्याचे भाग्य लाभले होते त्यानंतर आज तीन वर्षांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले, हे मंदिर भारतीय संस्कृती आणि संस्काराचे जतन करणारे ठिकाण आहे.
याशिवाय राष्ट्रीय एकात्मता ही खऱ्या अर्थाने मंदिराच्या माध्यमातूनच टिकून राहते.
तीन वर्षात नाशिकमध्ये मंदिर उभारण्यात आले ही बाब असंभवित आहे. धार्मिक नगरी बरोबरच मंत्र नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे.
आता पर्यटन देखील वाढणार असून मंदिरात येऊन भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिंदे यांनी केले.
मंदिर प्रशासनाने जनतेची सेवा करावी त्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील असेही शिंदे यांनी सांगितले.
इतकंच काय तर तीन महिन्यापूर्वी राज्यात आपलं सरकार आले आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे हे तुमचं सरकार असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या समवेत या सोहळ्याप्रसंगी नव्याने पालकमंत्री झालेले दादा भुसे, आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते.