Eknath Shinde PC : मोठी बातमी! अखेर एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रिपदाबाबत भूमिका जाहीर, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 27, 2024 | 4:17 PM

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, मात्र अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. याबाबत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Eknath Shinde PC : मोठी बातमी! अखेर एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रिपदाबाबत भूमिका जाहीर, नेमकं काय म्हणाले?
Follow us on

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. आता सर्वाचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीमध्ये 132 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी करण्यात येत आहे. निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी शिवसेना शिंदे गटाची आहे.

तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटानं मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता नवा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, मात्र अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये. याबाबत आता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. मी लाडका भाऊ हे पद मिळवलं आहे. ही मोठी ओळख आहे. काल मी मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना मी कुठलीही अडचण आणणार नाही. मला अडीच वर्ष संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल.  एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे  असं वाटू देऊ नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल, असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सांगितल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.