नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 30 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला होता. अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून याबाबत भूमिका मांडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये दोन्ही गटांना पक्षावर दावा सांगणारे कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता. यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपणार आहे.
शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं, याकडे अनेकांचं लक्ष होतं. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची विनंती मान्य केली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला वेळ वाढवून देण्यात आला आहे. पण चार आठवड्यांऐवजी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. शरद पवार गटाने उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. पण त्याऐवजी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून देण्यात आलाय. 8 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
एकीकडे शरद पवार गटाने वेळ वाढवून मागितला आहे. तसेच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पाठवलेल्या ई-मेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने नेमके कोणते कागदपत्रे सादर केले आहेत याची माहिती देण्यात यावी म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल, अशी विनंती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार गट काय करणार? हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. अजित पवार गटाने काय उत्तर दाखल केलंय? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.