नाशिक : ग्रामीण भागातील राजकारणाचा महत्वाचा भाग असलेल्या सहकारी संस्थांच्या (Co-operative Societies) निवडणूका (Election) कधी होणार याची चर्चा गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर होती. त्याचं कारणही अगदी तसंच आहे. 15 जुलै 2022 सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका होणार होत्या. मात्र मुसळधार पाऊस, पूर परिस्थिती आणि आपत्तीमुळे सहकार विभागाने स्थगिती दिली होती. खरंतर ग्रामीण भागात सहकारी संस्थांचं जाळं मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळे दैनंदिन व्यवहारात किंवा आयुष्यात सहकारी संस्थांशी सतत येणारा संपर्क त्यासाठी कारणीभूत ठरतो. मात्र आता सहकार विभागाने स्थगिती उठवली असून ऐन दिवाळीच्या (Diwali) काळात निवडणुका होणार आहेत. त्याबाबतचे आदेश काढत काही संस्थांचा निवडणूक कार्यक्रम देखील लवकरच जाहीर केला जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कधी कोरोनामुळे तर कधी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडत होत्या.
त्यातच अनेक संस्थांच्या संचालक मंडळाचा कालावधी उलटून दीड ते दोन वर्षे होऊन गेली होती त्यामुळे सभासदांमध्ये चलबिचल सुरु झाली होती.
त्यातच काही संस्थांवर प्रशासक नियुक्त आहे. त्यात जुलै महिन्यात निवडणूका जाहीर झाल्या होत्या मात्र त्याला प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.
निवडणुकीविषयी उत्सुकता वाढत असल्याने आता दिवाळीत निवडणुका होणार असून पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी संस्थेच्या तर मतदानाच्या प्रक्रियेला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने स्थगिती आल्याने मोठा हिरमोड झाला होता.
त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीचा फड रंगणार असून नाशिक जिल्ह्यातील 41 संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे.
ऐन दिवाळीत खरंतर नाशिक जिल्ह्यात मोठा गारवा असतो. त्यातच आता या गारव्यात निवडणुकीच्या राजकीय वातावरणाचा उष्मा अनुभवायला मिळणार आहे.