“लोकसभेत तुम्हाला 8 जागा, आम्हाला 7 जागा, मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?”; एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांना थेट सवाल

| Updated on: Dec 08, 2024 | 1:45 PM

"लोकांचा कौल स्वीकारला पाहिजे. रडीचा डाव बंद केला पाहिजे. जनतेने कौल दिला आहे. पुन्हा गिरेंगे तो टांग उपर असा प्रकार आहे", असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

लोकसभेत तुम्हाला 8 जागा, आम्हाला 7 जागा, मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?; एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांना थेट सवाल
एकनाथ शिंदे, शरद पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

Eknath Shinde On Sharad Pawar : विधानसभेत झालेल्या पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. महाविकासाआघाडीकडून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेतली जावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान घेतले होते. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केली. आता नुकतंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मारकडवाडीत जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. आता यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे.

“तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो. तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही आरोप केले”, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

हा ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा का?

“यापूर्वीच झारखंड, कर्नाटकात मतदान झालं. लोकसभेत झालं. प्रियांका गांधीही जिंकल्या. जेव्हा आपण हरतो, तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं. जेव्हा जिंकतो तेव्हा बॅलेट पेपरची कोणी मागत नाही. हा दुटप्पीपणा आहे. विरोधीपक्षाकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. मी म्हणालो होतो विरोधकांना लाडक्या बहिणी चार महिन्यात चीत करेल. सर्व घटकांनी विरोधकांना जागा दाखवली. घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाही. काम करणाऱ्यांना, फिल्डवर असणाऱ्यांना मतदान करतात. लोकसभेत दोन लाखांचा फरक असून त्यांना जागा जास्त असून त्यांचे उमेदवार जास्त आले. आम्हाला १७ जागा आणि महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. हा ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा का. त्यावेळी त्यांनी काही आक्षेप घेतला नाही. मी पवारांचं ऐकत होतं. काँग्रेसने १०० पेक्षा जास्त लढवल्या. आम्ही ८० जागा लढवल्या. प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळं गणित आहे. कोणी एक हजाराने निवडून आला. आमच्या ८ ते १० जागा हजार बाराशे मतांनी पराभूत झाल्या. मग आमच्या ७० जागा झाल्या असत्या. तेव्हा तर गहजब केला असता”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे लोकशाहीला घातक

“लोकसभा निवडणुकीत शिवसेनाला ७३ लाख ६७ हजार ६७३ मते मिळाली. आणि एनसीपीला ५८ लाख ५१ हजार १६६ मते मिळाली. आम्हाला ७३ लाख आणि एनसीपीला ५८ लाख मते मिळाली. आम्हाला मिळाल्या ७ जागा आणि एनसीपीला मिळाल्या ८ जागा. मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का हा माझा सवाल आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेणं. तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो. तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही आरोप केले. हे लोकशाहीला घातक आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

पुन्हा गिरेंगे तो टांग उपर असा प्रकार

“लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका जनतेने आमचं अडीच वर्षाचं काम पाहिलं. मी पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही वेगाने पूर्ण केले. लाडक्या बहिणीपासून अनेक योजना केल्या. त्याची पोचपावती मिळाली. त्यामुळे विरोधकांना आवाहन आहे हे रडगाणं थांबवा. आता विकास गाणं सुरू करा. नाना पटोले जिंकले. ११२ मतांनी जिंकले. रोहित पवार जिंकले. त्यात काय ईव्हीएम घोटाळा झाला का. कुणाला काही वाटेल म्हणून निर्णय घेऊ शकतो का. काही नियम ठरले आहेत. आयोग आहे आणि घटना आहे. लोकांचा कौल स्वीकारला पाहिजे. रडीचा डाव बंद केला पाहिजे. जनतेने कौल दिला आहे. पुन्हा गिरेंगे तो टांग उपर असा प्रकार आहे”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.