मुंबई : एसटी महामंडळाने प्रदुषण कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात ई -शिवनेरीचा समावेश केला आहे. एसटी महामंडळाने ठाणे ते पुणे मार्गावर नुकतिच ईलेक्ट्रीक शिवनेरीची सेवा सुरू केली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता महामंडळाने शुक्रवारपासून दादर ते पुणे मार्गावर इलेक्ट्रीक शिवनेरी बससेवा सुरू केली आहे. दादर ते पुणे इलेक्ट्रीक बस सेवा दर पंधरा मिनिटांनी चालविण्यात येणार असून तिचे तिकीट दर डीझेलवरील शिवनेरीपेक्षा कमी आहेत. दादर बस स्थानकातून आज पहिली दादर ते औंध ( पुणे स्टेशन ) ई – शिवनेरी बस रवाना करण्यात आली. यावेळी बसमधील प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्याचे स्वागत करण्यात आले.
एसटी महामंडळाने एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक शिवनेरीचा समावेश नुकताच करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ठाणे ते पुणे मार्गावर इ – शिवनेरीची सुरूवात करण्यात आली आहे. या ठाणे ते पुणे मार्गावर सध्या 14 इ – शिवनेरी धावत आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
एसटी महामंडळाने दादर ते पुणे मार्गावर 20 वर्षांपूर्वी साल 2002 मध्ये वातानुकूलित शिवनेरी सेवा सुरु होती, नंतर शिवनेरी हा एसटी महामंडळाचा अत्यंत प्रतिष्ठीत ब्रॅंड बनला. आता मुंबई ते पुणे मार्गावरील सर्व डीझेल शिवनेरींना इलेक्ट्रीक शिवनेरीत मध्ये रूपांतरीत करण्यात येणार आहे. शिवनेरीच्या दादर ते पुणे प्रवासाचे भाडे 515 रूपये असणार आहे. तर सवलतीचे अर्धे तिकीट 275 रूपये असणार आहे.
दादर ते पुणे मार्गावर सध्या दर पंधरा मिनिटांनी शिवनेरी सुटणार आहे. सध्या या मार्गावर पंधरा शिवनेरी दाखल झाल्या असून भविष्यात आणखीन पंधरा शिवनेरींचा समावेश होणार आहे. अशा दादर ते पुणे मार्गावर एकूण 30 ईलेक्ट्रीक शिवनेरी चालविण्यात येणार आहेत. दादर ते पुणे ईलेक्ट्रीक शिवनेरीसाठी परळ येथे इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. दादरहून पहीली बस स.5.15 वाजता सुटेल. त्यानंतर दर पंधरा मिनिटांनी बस सुटेल. शेवटची बस सायं. 6.31 वाजता सुटेल अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.
असे आहे वेळापत्रक
THANE TO SWARGATE ( E -SHIVNERI TIME TABLE )