कुसुमाग्रजनगरी, नाशिकः आपल्याला प्रगल्भतेची आस आहे का, ती तयार नसेल तर माध्यमांनी करावी, असे आवाहन रविवारी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी केले. तर आजची पत्रकारिता सत्य सांगायचे विसरली आहे. सत्याकडे बघून लाज वाटते. महागाई, दारिद्र्य, बेकारी इकडे दुर्लक्ष करून मनोरंजन करणे, हा अंमल माध्यमांना त्रासदायक ठरेल, याची आठवण माध्यम तज्ज्ञ जयदेव डोळे यांनी करून दिली. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण हा परिसंवाद झाला. यावेळी गिरीश कुबेर, जयदेव डोळे, विश्वंभर चौधरी, पत्रकार अपर्णा वेलणकर, विचारवंत डॉ. हरी नरके, पत्रकार प्रसन्न जोशी यांनी सध्याच्या पत्रकारितेवर थेट भाष्य करत एक समाज आणि एक पत्रकार म्हणून उपस्थितांना आत्मचिंतन करायला भाग पाडले.
बातमीच्या पलीकडे…
साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मुख्यसभा मंडपाकडे येताना कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगडेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. त्यानंतर झालेल्या संवादात कुबेर यांनी आपल्याला प्रगल्भतेची आस आहे का, ती तयार नसेल तर माध्यमांनी करावी, असे आवाहन केले. कुबेरांनी परिसंवादात अतिशय परखड मते मांडली. ते म्हणाले, येणाऱ्या काळात पत्रकाराचे बातमी देणे हेच काम राहणार आहे का, तर नाही. बातम्या येतच राहतील. त्या आपण थांबवू शकणार नाही. बातमीच्या पलीकडे, बातमीच्या अलीकडे देण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. तशी तयारी झालेली आहे का, असा रोकडा सवालही त्यांनी केला.
समाजाचे अवैचारिकरण
कुबेर म्हणाले,जसा समाज, तसे माध्यम असते. समाजाचे अवैचारिकरण झालेले आहे. त्यामुळे माध्यमांवर समाजाला वैचारिकतेकडे नेण्याची जबाबदारी आहे. समाज एका दिशेने जात असेल, तर माध्यमांनी मधे उभे राहून त्याला दिशा दाखवावी. समाजाला चांगले वाचायला द्यावे. लोकांना जे हवे ते द्यावे. मात्र, सोबतच त्यांनी काय वाचावे, हे सुद्धा द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्टीव्ह जॉब्स म्हणाला होता की, तुम्ही सगळ्यांना आनंदी करू शकत नाही. सगळ्यांना आनंदी करायचे असेल, आईस्क्रीमचे दुकाना टाकावे. हे माध्यमांनी सदोदित ध्यानात ठेवावे. त्यांनी भावनेवर स्वार होऊ नये. गोपाळ कृष्ण आगरकर म्हणत लोकांना काय वाटेल, याचा विचार संपादकांनी करू नये, असे रोखठोक आत्मपरीक्षण कुबेर यांनी केले.
वृत्तमाध्यमांचे नमोरंजन
माध्यम तज्ज्ञ जयदेव डोळे यांनी अतिशय खुसखुशीत, चिमटे काढत विषय मांडला. त्यांनी सुरुवातीला टोलेबाजी केली. ते म्हणाले, मला वाटले आजचा विषय हा माध्यमांचे ‘नमो’रंजन आहे. त्यांच्या ‘नमो’ या चिमट्यावर श्रोत्यांनी टाळ्यांचा वर्षाव केला. पुढे त्यांनी स्वतःवर मिश्लीक टिप्पणी करत माझे डोळे आडनाव आहे आणि मला मोदीबिंदू झाल्याची कोटी केली. हिटलर, मुसोलिनी ते अगदी कालपर्यंतचा ट्रम्प. राजकीय नेते मनोरंजनाचे साधन बनतात. हे जगाने सिद्ध केले. मात्र, भारतात ते झाले नाही. माध्यमांचा चांगला उपद्रव, वाईट उपद्रव लोकांना आवश्यक असतो. लोकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार बुद्धिवंतांना आणि कलावंतांना असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य असल्यावरच तक्रार करता येते
2014 पूर्वीच्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळच्या पत्रकारांना नेहरू, गांधी, चांगले वाटतात. कधी-कधी सावरकरही चांगले वाटतात. मात्र, 2014 साली स्वातंत्र्य मिळणे म्हणजे आपल्या साऱ्यांची अभिव्यक्ती हरवणे, अशी बोचरी टीका डोळे यांनी यावेळी केली. अनेकजण भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा मानतात. स्वातंत्र्य वगैरे विचार करू नका म्हणतात, पण स्वातंत्र्य असल्यावरच भाकरी मिळत नाही, याची तक्रार करता येते. हे ध्यानात ठेवून पत्रकारांनी मनोरंजनाच्या मागे न धावता सत्याकडे जाणारी वाट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. आजची पत्रकारिता सत्य सांगायचे विसरली आहे. सत्याकडे बघून लाज वाटते. महागाई, दारिद्र्य, बेकारी इकडे दुर्लक्ष करून मनोरंजन करणे, हा अंमल माध्यमांना त्रासदायक ठरेल, याची आठवणही त्यांनी करून दिली.
मराठी मीडियाचे विकृतीकरण नाही
विश्वंभर चौधरी म्हणाले की, आता आपण पत्रकारितेकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. हिंदी इतके मराठी पत्रकारितेचे विकृतीकरण झाले नाही. तुम्हाला पत्रकाराने बाळशास्त्री जांभेकरांसाठी लेखणी चालवावी वाटते. मात्र, त्यासाठी जांभेकरांच्या काळातला पगार त्यांना देऊन कसे चालेल, असा सवाल उपस्थित केला. मीडिया हा समाजचा आरसा असतो. सगळीकडे सुमारीकरण झाले आहे. जशी मागणी तसा पुरवठा होता. कुठल्याही गोष्टीसाठी पत्रकाराला बोल लावणे, योग्य नाही. माध्यमांना अजेंडा हवाच. आम्ही राशीभविष्य छापणार नाही, अशी भूमिका ज्येष्ठ संपादक अनंत भालेरावांनी घेतली होती. मात्र, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. फक्त एकच सांगावे वाटते की, माध्यमांनी राज्यघटनेच्या तत्त्वाशी एकरूप राहून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दिल्लीश्वरांच्या आरत्या ओवाळल्या
विचारवंत हरी नरके म्हणाले की, विचार कलहाला घाबरू नये. विचारकलह आवश्यक आहेत. मराठी माणूस मुळातच भांडकुदळ आहे. विचारकलह हीच मराठी माणसाची ओळख आहे. माणसांमध्ये सापाच्या जातीचे लोक असून, ते सगळ्या जातींमध्ये आहेत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. माध्यमांतले मनोरंजन हा विषय खूप जुना आहे. महसूल ओढण्यासाठी आपल्याकडे वाचक, प्रेक्षक खेचून घेण्यासाठी निर्बुद्ध करमणूक केली जाते. माध्यमांनी सात वर्षे दिल्लीश्वरांच्या आरत्या ओवळण्याचा कार्यक्रम केल्याचे बोलही त्यांनी सुनावले. दरम्यान, यावेळी संपादक अपर्ण वेलणकर आणि प्रसन्न जोशी यांनीही मते मांडली.
Girish Kuber | ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, नाशकात साहित्य संमेलन परिसरात प्रकार