मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या एकूण 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची सुनावणी सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर ही सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी लवकर घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार अपात्र होणारच असा दावा केलाय. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे अपात्र होणार नाहीत. जर झालेच तर आमचा प्लॅन बी तयार आहे असे सूचक विधान केलंय. ज्याला कोर्ट समजतं. कोर्टाची ऑर्डर समजते. ज्याने सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचली असेल. ज्याने निवडणूक आयोगाची ऑर्डर वाचली असेल तो शंभर टक्के सांगेल की शिंदे डिस्क्वॉलिफाय होणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी tv9 मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची केस विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर सुरू आहे. त्याचा निर्णय काय घ्यायचा हे ते ठरवतील. यापेक्षा अधिक सांगण्याचे कारण नाही. एका मिनिटासाठी हायपोथेटिकल सांगतो. समजून चला शिंदेंना डिस्क्वॉलिफाय केलं तरी ते मुख्यमंत्री राहू शकतात. काय अडचण आहे का तर नाही असे फडणवीस म्हणाले.
विधानपरिषदेच्या सध्या 21 जागा रिक्त हेत त्यातील 9 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून येणाऱ्या आमदारांच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होत नाही तोपर्यंत आमदारांचीही निवडणूक होणार नाही. तर, उरलेल्या १२ जागा या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या आहेत.
ठाकरे सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविली होती. मात्र, त्या फाईलवर राज्यपाल यांनी सही केली नाही. दरम्यानच्या काळात राज्यपाल कोश्यारी गेले आणि त्यापाठोपाठ ठाकरे सरकारही कोसळले. त्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ जागा अजूनही रिक्तच आहेत. हि नावे राज्यपाल यांनी मंजूर करावी यासाठी महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्य नेमण्यात यावे असे आदेश दिले. मात्र, सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी तेच मुख्यमंत्री राहतील असे सांगितले. ते विधान परिषदेवर येतील. अडचण काय? तरीही ते डिस्क्वॉलिफाय होतच नाही. आमची संख्या अशी आहे की कोणीही डिस्क्वॉलिफाय झालं तरी अडचण नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत काम केले आहे. कुठेही तसूभरही कायद्याची चौकट मोडली नाही. विचारपूर्वक नियमात बसून केलंय. त्यामुळे आम्हाला भीती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेत पाठवून तेच मुख्यमंत्री राहतील असे सांगितले. मात्र, जर एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र झाले. तर शिंदे गटातील तीन मंत्री आणि १2 आमदार यांचे काय होणार हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि डॉ. तानाजी सावंत या तीन मंत्र्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. तर, अन्य १2 आमदारांमध्ये संजय शिरसाट, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.