महिन्याभरापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं आणि 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागला. मतदारांनी महायुतीला भरघोस मतदान केल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला. मात्र महायुतीच्या या यशानंतर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत सरकारला धारेवर धरलं. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात याव अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली. ईव्हीएमवरून करण्यात आलेल्या सर्व आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत चोख प्रत्युत्तर दिलं. खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. तुम्ही जोपर्यंत आत्मपरिक्षण करत नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील असं म्हणत त्यांनी विरोधकांना खुल्या मनाने पराभव स्वीकारायचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी काही ओळी उद्धृत केल्या.
गालिब ता उम्र यह भूल करता रहा
धुल चेहरे पर थी, आईना साफ करता राहा
तुम्ही जोपर्यंत तुमचा चेहरा साफ करणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मपरीक्षण करता येणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला हाणला.
ईव्हीएमचा इतिहास
यावेळी फडणवीसानी ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधकांना धारेवर धरले. ईव्हीएमचा इतिहासही सांगितला पाहिजे. 6 ऑगस्ट 1980 रोजी ईव्हीएमचं पहिलं सादरीकरण झालं. 19 मे 1982ला ईव्हीएमचा वापर झाला. 1988 ला विधानसभेत वापर झाला. 1999ला लोकसभेत वापर झाला. त्यानंतर देशात सर्वत्र ईव्हीएमचा वापर झाला. मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. त्यानंतर पुन्हा ईव्हीएमचा वापर झाला आणि मनमोहन सिंग सरकार आलं. 2014 मध्ये मोदींचं सरकार आलं आणि ईव्हीएम वाईट झालं. आता कोर्टावरही टीका होते. आपल्या बाजूने निकाल आला तर उत्तम, नाही तर कोर्ट वाईट असं म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.
दोन तासात याचिका निकाली काढली म्हणता. त्या आधी ईव्हीएमवर कोर्टाने निर्णय दिला होता. त्यांनी सविस्तर निकाल दिला होता. त्यात त्यांनी आधी पूर्वीचा निकाल वाचा आणि नंतर आमच्याकडे या असं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात 62वकिलांनी बाजू मांडली होती. त्यांनी प्रत्येक तांत्रिक मुद्द्यावर कोर्टाने भाष्य केलं आहे, असं फडणवीसांनी नमूद केलं.
खुल्या मनाने जनादेश स्वीकारा
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं. ईव्हीएम टॅम्पर होऊ शकतं त्यांनी यावं असं आयोगाने सांगितलं. आठ दिवस दिले. एकही राजकीय पक्ष गेला नाही. बाहेर बोलतो. पण त्या ठिकाणी कोणी गेलं नाही. त्यामुळे विनंती आहे की, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. तुम्ही जोपर्यंत आत्मपरिक्षण करत नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील. आम्ही लोकसभेत हरलो. आम्ही ईव्हीएमवर खापर फोडलं नाही. फेक नरेटिव्हमुळे आम्ही हरलो. आता थेट नरेटीव्हने आम्ही उत्तर देऊ असं सांगितलं. आम्ही मेहनत केली.
तुम्ही तुमचा जोपर्यंत चेहरा साफ करणार नाही. तुम्हाला तुमचं आत्मपरिक्षण करता येणार नाही , याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला.