संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरुंगात मारहाण झाल्याची बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या कारागृहात आहेत, तिथेच त्यांना मारहाण झाल्याची बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे. आता या प्रकरणात बीड जिल्हा कारागृहाकडून प्रेसनोट जारी करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हटलं?
न्यायालयीन कोठडीत असलेले बंदी सुदिप रावसाहेब सोनवणे व राजेश अशोक वाघमोडे हे दोघं त्यांना जिथे कारागृहात ठेवण्यात आलं आहे, तेथील मोकळ्या जागेत त्यांना देण्यात आलेल्या सुविधेनुसार ते आपल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी आले होते. याचदरम्यान एकमेकांकडे बघून त्या दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांमध्ये झटापट देखील झाली. कर्तव्यावर असलेले पोलीस त्यांचा वाद सोडवत असतानाच तिथे इतर देखील काही कैदी जमा झाले. त्यामुळे गोंधळ वाढला, इतरही कैदी शिविगाळ करू लागले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली व कैद्यांना पुन्हा आपआपल्या बरॅकमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. या घटनेशी संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यााठी बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेनंतर वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कोणतीही मारहाण झालेली नाही, असं तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे, सध्या या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचं आरोप पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केलं आहे, मात्र अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र अजूनही त्याला अटक करण्यात यश आलेलं नाहीये.