अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडमधील फरार आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आता खंडणीचाही गुन्हा बाळ बोठेवर दाखल झाला आहे. नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एका महिलेने केला असून नगरच्या तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये बोठेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Extortion case filed against Bal Bothe)
बोठेने नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तसंच वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करुन आपली बदनामी केल्याचा बोठेवर आरोप करण्यात आला आहे. मंगल किसन हजारे असं महिला फिर्यादीचे नाव आहे. बोठेसह वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे यांचंही यामध्ये नाव घेण्यात आलं आहे. तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्यादीत मंगल हजारे-भुजबळ यांनी म्हटले आहे की, “जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील क्षयरोग केंद्रात त्या वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक होत्या, त्यांची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने झालेली होती. 10 जुलै 2019 रोजी बाळ बोठेनं माहितीचा अधिकारात हजारेंबद्दल वैयक्तिक माहिती मागवली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या विभागात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला असे निवेदन रेखा जरे यांच्या यशस्विनी महिला ब्रिगेडतर्फे कार्यालयात देण्यात आलं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात शहरातील स्मिता अष्टेकर यांनीही असंच निवेदन दिलं. या निवदेनांच्या बातम्या फक्त बोठे कार्यकारी संपादक असलेल्या वृत्तपत्रातच येत होत्या. त्यावर आपण पत्रकार परिषद घेऊन या बातम्या कशा चुकीच्या आहेत, हे पुराव्यानिशी दाखवून दिले. मात्र, बोठेनं चुकीच्या बातम्या देणं सुरुच ठेवलं”
“त्यानंतर दोन दिवसांनी बोठे याने मला चर्चा करण्यासाठी बोलाविले. तेव्हा आम्ही माझ्या कार्यालयाच्या बाहेर सिव्हिल हॉस्पिटल कंपाऊंडजवळ भेटलो. बोठे म्हणाला की तुमच्या कार्यालयातील अधिकारी डॉ. भागवत दहीफळे माझे चांगले मित्र असून ते मला सर्व गोपनीय माहिती पुरवतात. त्यानुसार बरीच माहिती मला प्राप्त झाली आहे. तुम्ही कार्यालयाची परवानगी न घेता महापालिकेची निवडणूक लढविली आहे. ही महत्वाची माहिती माझ्या हाती लागली आहे. जर यातून सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर मला दहा लाख रुपये द्यावे लागतील. आपण हे शक्य नसल्याचे त्याला सांगितले. त्यावर त्याने तुमची नोकरी नक्कीच जाणार, असे मला सांगितले.”
“त्यानंतर बोठे याने आमच्या कार्यालयातील डॉ. दहीफळे याला हाताशी धरून, आपल्या पदाचा गैरवापर करून, वरिष्ठांवर दबाव आणून मला कंत्राटी नोकरीतून बडतर्फ करण्यास भाग पाडले. या विरोधात आपण हायकोर्टात दाद मागितली होती. तेथे कोर्टाने निकाल दिला की कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांसाठीचे नियम कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू होत नाहीत. असे असूनही बोठे काम करीत असलेल्या वृत्तपत्रात 12 फेब्रुवारी २०२० रोजी बातमी आली की, मंगल भुजबळ यांची बडतर्फी हायकोर्टातही कायम. अशी चुकीची बातमी छापून बोठे याने माझी बदनामी केली. त्यामुळे माझी नोकरीवर फेरनियुक्ती न झाल्याने मी नोकरीपासून वंचित राहिले”, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल किसन हजारे-भुजबळ (वय 38, रा. सागर कंपलेक्स स्टेशन रोड, आगरकर मळा, अहमदनगर) यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. 10 जुलै 2019 ते 12 डिसेंबर 2020 या काळात हा गुन्हा घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध संगमनत करून खंडणी मागितल्याचा आणि बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा :
Bal Bothe | रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या अडचणीत वाढ, विनयभंगाचा गुन्हा दाखल
रेखा जरे हत्याप्रकरण: आरोपी बाळ बोठेला मदत करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून अटक