राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे उद्या तिसऱ्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज महायुतीमधील प्रमुख नेते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर करण्यात आलं आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय सुट्टी नाही. या महाराष्ट्रात आमची ती संस्कृती आहे, विरोध केला जातो आणि मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या जातात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नाही. दरम्यान सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून, मरेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. हीच आंदोलनाची पुढची दिशा असल्याचही जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नव्या सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.
सत्ता आली बहुमताने निवडून आलात, पण मराठ्यांशिवाय सत्तेत कोणीही बसू शकत नाही. मराठे जोपर्यंत शांत राहतात तो पर्यंत शांत राहतात. अन्यथा ते कोणाच्याही बापाला घाबरत नाहीत. एकदा जर मराठा रस्त्यावर उतरला तर तुमचं काही खरं नाही असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान उद्या आझाद मैदानात नव्या सरकाराच शपथविधी होणार आहे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत.